श्री मंगळग्रह मंदिरात आजपासून रंगणार अमळनेरच्या लेकींचा कौतुक सोहळा ‘माहेरचा पारिजात’ उपक्रमातून बालपणीच्या आठवणींना मिळणार उजाळा; तीन दिवस रंगणार स्नेहमेळा.

0

अमळनेर/आबिद शेख
अमळनेर : माहेरच्या अंगणातील बालपणीच्या आठवणींना उजाळा देत, आपल्या कर्तृत्वाने सासर-माहेर दोन्ही कुटुंबे समृद्ध करणाऱ्या अमळनेरच्या लेकींसाठी आगळावेगळा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अमळनेर महिला मंच ट्रस्टच्या वतीने ‘माहेरचा पारिजात’ या उपक्रमांतर्गत शनिवार, दि. २९ ऑगस्ट ते सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ दरम्यान श्री मंगळग्रह मंदिर परिसरात हा विशेष स्नेहमेळा रंगणार आहे. या उपक्रमाला मंगळग्रह सेवा संस्थेचे विशेष सहकार्य लाभले आहे.


पारिजातकाच्या फुलांचा सडा जसा अवघे अंगण सुगंधित करतो, त्याचप्रमाणे माहेरच्या लेकी आपल्या अस्तित्वाने, कर्तृत्वाने आणि मायेने सासर-माहेरची दोन्ही घरे उजळून टाकतात. याच भावनेतून ‘माहेरचा पारिजात’ या उपक्रमाची संकल्पना साकारण्यात आली आहे. माहेरच्या अंगणात पुन्हा एकदा बालपणाची अनुभूती घेता यावी, जुन्या आठवणींना उजाळा मिळावा आणि मैत्रिणींसोबत मनमोकळ्या गप्पांची मैफल रंगावी, हा या स्नेहमेळ्यामागील प्रमुख उद्देश आहे.


या तीन दिवसीय स्नेहमेळ्यात भाषण, कविता, गाणी, नृत्य, विनोद, पारंपरिक खेळ, उखाणे, मंगळागौरीचे खेळ यांसह विविध मनोरंजक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हिरवाईने नटलेल्या श्री मंगळग्रह मंदिर परिसरातील प्रसन्न आणि मंगलमय वातावरणात हा सोहळा आनंद, उत्साह आणि भावनिक आठवणींनी फुलणार आहे.
या उपक्रमासाठीची नोंदणी आता पूर्णत्वास आली असून, कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्षा सौ. कांचनताई शहा, उपाध्यक्षा सौ. तिलोत्तमाताई पाटील व सौ. सरोजताई भांडारकर, सचिव सौ. वसुंधराताई लांडगे, खजिनदार प्रा. सौ. शीलाताई पाटील यांच्यासह महिला मंचच्या कार्यकारी मंडळातील सदस्या तसेच मंगळग्रह सेवा संस्थेचे सर्व विश्वस्त व सेवेकरी परिश्रम घेत आहेत.
माहेरच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि माहेरच्या लेकींचा सन्मान अनुभवण्यासाठी सर्व माहेरवाशिणींनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
आजचा कार्यक्रम : शनिवार, दि. २९ ऑगस्ट
सकाळी ९.०० वाजता : माहेरवाशिणींचे स्वागत, हळद-कुंकू लावून औक्षण, गजरे वाटप व ढोल-ताशांच्या गजरात श्री मंगळग्रह देवांची सामूहिक आरती.
सकाळी ९.३० वाजता : अल्पोपहार, मेंदी लावणे, बांगड्या भरणे व माहेरवाशिणींचा स्वपरिचय.
दुपारी १२.१५ वाजता : सामूहिक अभिषेक.
दुपारी १.१० वाजता : सामूहिक भोजन.
दुपारी २ ते ३ वाजता : विविध बैठे खेळ.
सायंकाळी ५.३० वाजता : सामूहिक चहापान.
सायंकाळी ५.५५ वाजता : श्री मंगळग्रह देवांची सामूहिक आरती.
सायंकाळी ७.३० वाजता : दीपप्रज्वलन, माहेरवाशिणींचा सन्मान, मंगळागौर आदी कार्यक्रम.
रात्री ९.३० वाजता : रात्रीचे भोजन व विविध मनोरंजक खेळ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed