राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अमळनेरच्या नूतन भोईच्या क्रीडा कामगिरीचा गौरव इनलाइन स्केटिंग, आईस हॉकी व शूटिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावर ठसा.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर  : राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून अमळनेर शहराचे नाव क्रीडा विश्वात उज्ज्वल करणाऱ्या भोईवाडा परिसरातील गुणी राष्ट्रीय खेळाडू नूतन किशोर भोई हिच्या उल्लेखनीय क्रीडा प्रवासाचा विशेष गौरव होत आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपल्या अष्टपैलू कौशल्याच्या बळावर राष्ट्रीय व विभागीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत नूतनने अमळनेर तालुक्याच्या नावलौकिकात भर घातली आहे.


नूतन भोई हिने विविध आव्हानात्मक क्रीडा प्रकारांमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत नाशिक विभागीय स्तरावर तिने उत्कृष्ट अचूकता व एकाग्रतेचे प्रदर्शन करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.


तसेच ६३ व्या नॅशनल इनलाइन रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप २०२५ मध्ये विशाखापट्टणम येथे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करत तिने आपल्या वेगवान आणि कौशल्यपूर्ण खेळाची छाप पाडली. याशिवाय IHAI नॅशनल आईस हॉकी चॅम्पियनशिप २०२६ मध्ये डेहराडून, उत्तराखंड येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेतही तिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
राष्ट्रीय स्तरावरील विविध खेळांमध्ये सहभाग नोंदवून नूतन भोई हिने ग्रामीण भागातील खेळाडूंमध्येही मोठी क्षमता आणि जिद्द असल्याचे सिद्ध केले आहे.
ग्रामीण खेळाडूंना आधुनिक सुविधा मिळाव्यात – नूतन भोई
आपल्या क्रीडा प्रवासाबाबत बोलताना नूतन भोई म्हणाली की, ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये अफाट गुणवत्ता आणि जिद्द असूनही अनेकांची स्वप्ने आर्थिक अडचणींमुळे अपुरी राहतात.
“मी इनलाइन स्केटिंग, आईस हॉकी आणि शूटिंगमध्ये राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केले असून, भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी पदक जिंकण्याचे माझे ध्येय आहे. मात्र, यासाठी आवश्यक असलेले महागडे क्रीडा साहित्य आणि प्रवासाचा खर्च मोठा असतो. शासनाने ग्रामीण खेळाडूंसाठी नियमित शिष्यवृत्ती, आर्थिक मदत, दर्जेदार क्रीडा साहित्य आणि तज्ज्ञ प्रशिक्षक उपलब्ध करून द्यावेत. अमळनेरसारख्या भागात आधुनिक क्रीडा संकुले उभारल्यास आमच्यासारखे ग्रामीण खेळाडू ऑलिम्पिकपर्यंत मजल मारून देशाचा तिरंगा उंचावू शकतील,” अशी भावना तिने व्यक्त केली.
भोईवाडा, अमळनेर येथील रहिवासी असलेल्या नूतनच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अमळनेरवासीयांसह क्रीडाप्रेमींनी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढील क्रीडा प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed