राज्यस्तरीय स्क्वॉश स्पर्धेत मोक्षदा पाटीलची चमकदार कामगिरी; कांस्यपदकावर कोरले नाव! राणाईचे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा; मोक्षदाच्या यशाचे सर्वत्र कौतुक.
अमळनेर/ आबिद शेख 
अमळनेर : क्रीडा क्षेत्रात आपल्या जिद्द, मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर राणाईचे येथील मोक्षदा प्रदीप पाटील हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यस्तरीय स्क्वॉश स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तिने कांस्यपदक पटकावले. तिच्या या यशामुळे राणाईचे गावासह कुटुंबाचा आणि परिसराचा गौरव वाढला आहे.

स्क्वॉश फेडरेशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत मोक्षदाने सहभाग घेत प्रतिस्पर्धी खेळाडूंना कडवी झुंज दिली. सातत्यपूर्ण सराव, खेळातील अचूकता, आत्मविश्वास आणि मैदानावरील जिद्दीच्या जोरावर तिने पदकाला गवसणी घातली. तिच्या या यशाने राणाईचे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मोक्षदाने मिळवलेले कांस्यपदक हे तिच्या मेहनतीचे आणि चिकाटीचे फलित असून ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही मुली मोठी कामगिरी करू शकतात, हे तिने आपल्या यशातून सिद्ध केले आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मोक्षदा पाटील हिचे पालक, शिक्षक, प्रशिक्षक, मित्रपरिवार आणि क्रीडाप्रेमींकडून अभिनंदन होत आहे. विशेषतः स्वप्नील पाटील सर यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भविष्यात तिने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही यश संपादन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

