अमळनेर रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर दुचाकींचा विळखा; प्रवाशांची गैरसोय रेल्वे प्रशासनाने तातडीने पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी.
अमळनेर /आबिद शेख 
अमळनेर : खानदेशातील सर्वात सुंदर रेल्वे स्थानकांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या अमळनेर रेल्वे स्थानकावर सध्या बेशिस्त दुचाकी पार्किंगचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांचा रस्ताच दुचाकींच्या पार्किंगमुळे अडवला जात असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच रस्त्यावर मोटारसायकली उभ्या केल्या जात असल्याने प्रवाशांना बाहेर जाण्यासाठी पुरेशी जागा राहत नाही. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांना या अडथळ्याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा प्रवाशांना दुचाकींच्या गर्दीतून वाट काढत बाहेर पडावे लागते.
एकीकडे अमळनेर रेल्वे स्थानकाची सुंदरता आणि सुविधा यांची चर्चा होत असताना दुसरीकडे मुख्य प्रवेशद्वारावरच दुचाकींचा विळखा पडल्याने स्थानकाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रेल्वे स्थानक परिसरात दुचाकी पार्किंगसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देणे आणि प्रवेशद्वारासमोरील रस्ता मोकळा ठेवणे गरजेचे आहे.
तरी रेल्वे प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन मुख्य प्रवेशद्वारासमोरील बेशिस्त दुचाकी पार्किंग हटवावी, तसेच दुचाकींसाठी स्वतंत्र व नियोजनबद्ध पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
