गोवंश हत्या प्रकरणाचे पडसाद; अमळनेरात हजारोंचा मोर्चा, व्यापाऱ्यांनीही ठेवली दुकाने बंद.
अमळनेर/आबिद शेख 
अमळनेर शहरातील कत्तलखान्यात कथितरीत्या वारंवार गोवंश हत्या होत असल्याच्या आरोपावरून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, या प्रकरणाच्या निषेधार्थ २७ नोव्हेंबर रोजी अमळनेरात भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, गोसंरक्षक आणि विविध सामाजिक संघटनांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात सुमारे तीन हजार नागरिक सहभागी झाले होते.
तिरंगा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील लालबाग शॉपिंग परिसरासह प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करीत मोर्चा नगर परिषद कार्यालयावर धडकला. यावेळी आंदोलकांनी कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करून तो जमीनदोस्त करावा, अशी जोरदार मागणी केली. तसेच प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

मोर्चात पूज्य गोविंददास महाराज (नंदगाव), पूज्य प्रदीपदास महाराज, महंत हरिहानंदगिरीजी ऊर्फ दाटूर महाराज, महंत गौरीताई, राष्ट्रसंत गोरक्षा अखाड्याचे संत, महंत, गोसेवक तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांसह सचिन माळी, सचिन नाथजी, विश्वनाथ गवळी, स्वप्निल पाटील, शैलेश महाजन, हं. संजय शहा आणि विनय पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
नगर परिषद कार्यालयासमोर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत कत्तलखाना पाडण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू केले. मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा; बाजारपेठेला बंदचे स्वरूप
या जनआक्रोश मोर्चाला शहरातील व्यापारी वर्गाचाही मोठा पाठिंबा मिळाला. भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदार, विविध व्यावसायिक आणि अन्य व्यापाऱ्यांनी स्वेच्छेने आपापली दुकाने बंद ठेवून आंदोलनाला समर्थन दिले. त्यामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. सुमारे तीन हजार नागरिकांच्या सहभागामुळे संपूर्ण शहरात या मोर्चाची चर्चा होती.
कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करून तो हटविण्याच्या मागणीवर आंदोलक ठाम असून, आता नगर परिषद प्रशासन आणि संबंधित अधिकारी या आंदोलनाबाबत काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

