अमळनेरात संविधान दिन उत्साहात साजरा; आदिवासी विकास सामाजिक परिषदेचा पुढाकार संविधानाच्या मूलभूत मूल्यांवर मान्यवरांचे मार्गदर्शन; उद्देशिका प्रत्यक्ष जीवनात अंगीकारण्याचे आवाहन.
अमळनेर/आबिद शेख 
अमळनेर : भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून अमळनेर येथे आदिवासी विकास सामाजिक परिषदेच्या वतीने संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या तत्त्वांवर सखोल विचारमंथन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अमळनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. संविधानाच्या जयघोषाने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुभाष अण्णा चौधरी आणि अमळनेर वकील संघाच्या माजी अध्यक्ष ॲड. तिलोत्तमा पाटील यांनी संविधानातील विविध तरतुदी आणि मूलभूत मूल्यांचे महत्त्व विशद केले. संविधानाची उद्देशिका केवळ वाचण्यापुरती मर्यादित न ठेवता तिच्यातील विचार आणि तत्त्वे प्रत्येकाने आपल्या आचरणात आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक समता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी संविधानाची जाणीव प्रत्येक नागरिकाला असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
विश्वशांती बहुउद्देशीय संस्था आणि आदिवासी विकास सामाजिक परिषदेच्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते प्रविण बैसाणे यांच्यासह आदिवासी नेते आप्पा दाभाडे, गोरख साळुंखे, विनोद मोरे (खडके), दयाराम मोरे (बहादरवाडी), देवाभाऊ देसले, कृष्णकांत शिरसाठ, बाळासाहेब सोनवणे, मधुकर चव्हाण, रामदास ढालवाले, सतीश पारधी, संजय सोनवणे, अजहर तडवी, अशोक भील, विजय भील, योगेश भील, राजेंद्र वाघ, संजय भील, दीपक दाभाडे, कैलास भास्कर, रतीलाल बोरसे, मंगल भील, आशिष ब्रम्हे, गुलाब साळुंखे, पुनमचंद चव्हाण, ज्योतीबाई दाभाडे, कल्याणी पारधी आणि निशा पारधी यांच्यासह तालुक्यातील आदिवासी बांधव, विधिज्ञ, सामाजिक कार्यकर्ते व संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमातून संविधानाबद्दल जनजागृती करण्यासोबतच सामाजिक एकोपा, समानता आणि लोकशाही मूल्यांचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला.
