अमळनेर नगर परिषदेत स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न.
अमळनेर /आबिद शेख 
शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने अमळनेर नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी चार दिवसीय क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छ भारत अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत 23 ते 26 नोव्हेंबर 2026 या कालावधीत ही कार्यशाळा उत्साहात पार पडली.

या प्रशिक्षणामध्ये प्रभाग मुकादम, सफाई कर्मचारी, घंटागाडी व ट्रॅक्टर चालक, मदतनीस तसेच घनकचरा प्रक्रिया केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणादरम्यान कचऱ्याचे उगमस्थानी वर्गीकरण, कचरा संकलन, सुरक्षित वाहतूक, शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया व विल्हेवाट, आधुनिक स्वच्छता पद्धती तसेच कामाच्या ठिकाणी आरोग्य आणि सुरक्षितता या महत्त्वपूर्ण विषयांवर कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली.
अमळनेर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आरोग्य निरीक्षक संतोष जाधव, स्वच्छता निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, किरण कंडारे, संतोष माणिक तसेच शहर समन्वयक गणेश गढरी व युनूस शेख उपस्थित होते.
स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कौशल्य आणि कार्यक्षमता वाढविण्यासोबतच त्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे, हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध, सक्षम आणि परिणामकारक होण्यास मदत होणार आहे.

