‘आरोग्य रत्न २०२६’ पुरस्काराने डॉ. अनिल शिंदे सन्मानित आरोग्यसेवेतील उल्लेखनीय कार्याची ‘पुढारी’कडून दखल; अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय वैद्यकीय सेवा, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावी कार्य केल्याबद्दल अमळनेरचे सुप्रसिद्ध सर्जन डॉ. अनिल शिंदे यांना ‘पुढारी आरोग्य रत्न २०२६’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. नाशिक येथे आयोजित विशेष पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते डॉ. शिंदे यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.


गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. शिंदे अमळनेरसह विविध भागांतील रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा देत आहेत. अनेक गंभीर व गुंतागुंतीच्या आजारांवर तसेच आव्हानात्मक शस्त्रक्रियांवर यशस्वी उपचार करून त्यांनी रुग्णांना दिलासा दिला आहे. त्यांच्या वैद्यकीय कौशल्यासोबतच रुग्णांप्रती असलेला संवेदनशील आणि आपुलकीचा दृष्टिकोन यामुळे त्यांनी रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे.


आरोग्यसेवेकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कार्य करणाऱ्या डॉ. शिंदे यांच्या कामाची दखल ‘पुढारी’ वृत्तपत्र समूहाने घेतली. त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांची ‘आरोग्य रत्न २०२६’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
नाशिक येथील या सोहळ्यास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते, संपादक राहुल रनाळकर यांच्यासह आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
उत्तर महाराष्ट्रातील ३६ डॉक्टरांचा गौरव
उत्तर महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ३६ डॉक्टरांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला. त्यामध्ये अमळनेर तालुक्यातून पुरस्कार मिळविणारे डॉ. अनिल शिंदे हे एकमेव डॉक्टर ठरले. त्यामुळे त्यांच्या या सन्मानाबद्दल अमळनेरसह परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हजारो रुग्णांवर उपचार करताना गंभीर परिस्थितीतील रुग्णांच्या जीवनासाठी निर्णायक भूमिका बजावणाऱ्या डॉ. शिंदे यांच्या वैद्यकीय सेवेचा झालेला हा गौरव त्यांच्या कार्याची पावती मानला जात आहे. या पुरस्कारामुळे अमळनेरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed