नवीन मराठी शाळेत रक्षाबंधनाचा उत्साह; विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक राख्या बनवत दिला सामाजिक बांधिलकीचा संदेश.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : येथील नवीन मराठी शाळेत रक्षाबंधनाचा सण उत्साहपूर्ण, आनंदी आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये प्रेम, आदर, बंधुभाव तसेच सामाजिक बांधिलकीची भावना रुजविणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता शाळेच्या पटांगणात झाली. मुख्याध्यापक श्री. अतुल भोई यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींनी ‘राखी बंधनाचा सण’ हे सुमधुर गीत सादर करून वातावरणात उत्साह निर्माण केला.
यावेळी शाळेत ‘राखी बनवा’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून आकर्षक व रंगीबेरंगी राख्या तयार केल्या.
त्यानंतर विद्यार्थिनींनी वर्गमित्र तसेच शिक्षकांना औक्षण करून राखी बांधली. विद्यार्थ्यांनीही बहिणींना ओवाळणी देत त्यांच्या रक्षणासाठी सदैव पाठीशी राहण्याचे वचन दिले. एकमेकांचे तोंड गोड करून विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचा आनंद साजरा केला.
मुख्याध्यापक श्री. अतुल भोई यांनी रक्षाबंधनाच्या सामाजिक व सांस्कृतिक महत्त्वावर मार्गदर्शन केले. “रक्षाबंधन हा सण केवळ रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित नसून समाजात एकमेकांविषयी आदर, प्रेम आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा संदेश देतो,” असे त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या काही राख्या व शुभेच्छापत्रे देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांना तसेच मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम्’ने करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

