दिव्यांगत्वावर मात करत केशव भांगरे यांची गगनभरारी; ११९ वा गड सर करत माहुलीगडावर फडकवला भगवा! ८ वर्षीय चिमुकल्या तन्मयचीही वडिलांसोबत ऐतिहासिक कामगिरी; आतापर्यंत १० किल्ले सर.

0

24 प्राईम न्यूज 25 Nov 2026

अकोले : जिद्द, चिकाटी आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतेही आव्हान अशक्य नसते, हे पुन्हा एकदा सिद्ध करत राजूर (देवगाव), ता. अकोले येथील दिव्यांग गिर्यारोहक केशव किसन भांगरे यांनी ठाणे जिल्ह्यातील माहुलीगड सर केला. रविवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी त्यांनी २ हजार ८१५ फूट उंचीचा माहुलीगड यशस्वीरीत्या सर करत आपल्या गडभटकंतीतील ११९ व्या गडाची नोंद केली. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विशेष म्हणजे, या मोहिमेत त्यांचे अवघे ८ वर्षांचे चिरंजीव तन्मय केशव भांगरे यांनीही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत माहुलीगड सर केला. तन्मयचा हा दहावा किल्ला असून, बाप-लेकाच्या या साहसी मोहिमेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

कार्यालयीन जबाबदाऱ्या सांभाळून सुट्टीच्या दिवशी गड-किल्ल्यांची भटकंती हा केशव भांगरे यांचा छंद आहे. महाराष्ट्रातील ११८ गड-किल्ले आणि शिखरे यशस्वीरीत्या सर केल्यानंतर त्यांनी ११९ व्या मोहिमेसाठी माहुलीगडाची निवड केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या माहुलीगडासह पळसगड आणि भंडारगड या दुर्गत्रिकुटाच्या परिसरात त्यांनी भगवा ध्वज फडकवला.

“गड सर करणे म्हणजे केवळ शिखर गाठणे नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवणे आहे. नोकरी आणि कार्यालयीन कामकाज सांभाळून सुट्टीच्या दिवशी मी गडभटकंती करतो. माझ्या मुलालाही लहानपणापासून गड-किल्ल्यांचा इतिहास समजावा, यासाठी त्याला सोबत घेऊन जातो,” अशी भावना भांगरे यांनी व्यक्त केली.

या मोहिमेत त्यांच्यासोबत भाऊराव भांगरे (नाशिक), मधुकर सगभोर (राहाता), तुकाराम कचरे (कोपरगाव), गणेश देशमुख (पुणे), विष्णू लोखंडे (अकोले), उमेश वेडे (टिटवळा), हिरामण भवारी (ठाणे) आणि प्रवीण पदमेरे (ठाणे) यांनी सहभाग घेतला.

रेकॉर्ड बुकमध्येही भांगरे यांच्या कामगिरीची नोंद

केशव भांगरे यांच्या साहसी कामगिरीची विविध विक्रम पुस्तकांमध्ये नोंद झाली आहे. Genius Book of Records मध्ये ११४ अवघड गड सर करणारे पहिले दिव्यांग गिर्यारोहक म्हणून त्यांची नोंद आहे. तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ९०, तेलंगणा बुक ऑफ रेकॉर्डमध्ये १०० गड-किल्ले सर केल्याची नोंद करण्यात आली आहे. हरिश्चंद्रगडावरील कोकणकड्यावरून १ हजार ८०० फूट रॅपलिंग करून ठाणे जिल्ह्यात जाण्याच्या कामगिरीची लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद आहे. याशिवाय महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई शिखर त्यांनी तब्बल १३ वेळा सर केले आहे.

भांगरे यांना आतापर्यंत २५ हून अधिक आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. शिव ऊर्जा प्रतिष्ठान, संभाजीनगर यांच्या सहकार्याने त्यांनी महाराष्ट्रातील १११ दिव्यांगांना कळसूबाई शिखर सर करण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांना शिखरावर नेण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

“दिव्यांग व्यक्तीदेखील गड-किल्ले सर करू शकते, हा आत्मविश्वास समाजात निर्माण करणे हाच माझा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाचे १५० गड सर करण्याचे माझे स्वप्न आहे,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

मोहिमेच्या यशस्वी पूर्ततेनंतर शिखरावर ‘जय शिवराय, जय महाराष्ट्र’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. यावेळी माहुली वनविभागाचे कर्मचारी गुरुनाथ अगविले यांनी गिर्यारोहकांचे स्वागत केले. दिव्यांगत्वावर मात करत सुरू असलेली केशव भांगरे यांची ही गडभटकंती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed