पुरस्कारांनी रंगणार साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व करणारे आणि ‘शिंगाड्यावाला शेतकरी नेता’ म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार साथी गुलाबराव पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यंदाच्या राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कारासाठी माजी आयकर सहआयुक्त (E.D.) उज्ज्वलकुमार चव्हाण, तर राजकीय (पुरोगामी) पुरस्कारासाठी मिरा-भाईंदर महापालिकेचे माजी नगरसेवक मिलन म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे.


अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ व साने गुरुजी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २१ व २२ ऑगस्ट रोजी ‘साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह’ आयोजित करण्यात आला आहे. या दोन दिवसीय सोहळ्यात विविध वैचारिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, पुरस्कार वितरण सोहळा २२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होणार आहे.
पारलिंगी समाज अभ्यासक व पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्या शमिभा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे. पुरस्काराचे स्वरूप लाल टोपी, बागायतदार रुमाल, २१ हजार रुपये रोख आणि ‘शिंगाडेधारी गुलाबराव पाटील’ स्मृतीचिन्ह असे आहे.


राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
समारोहाच्या निमित्ताने २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. ‘अरे पुन्हा पेटवा आयुष्याच्या मशाली’, ‘मानवी बुद्धीला आव्हान : समजदारीचे की कृत्रिम बुद्धिमत्तेचे?’, ‘शिक्षण आहे, पण मती, नीती आणि गती कुठे आहे?’, ‘पुन्हा खेड्याकडे चालावे का?’, ‘लोकशाहीचा वेध : प्रश्न विचारण्याची शक्ती की शांततेची सक्ती?’ आणि ‘बदलता समाज आणि बदलते कायदे’ हे स्पर्धेचे विषय आहेत.
स्पर्धेसाठी जळगावचे प्रा. राजेंद्र देशमुख, धरणगावचे कविवर्य बी. एन. चौधरी आणि अमळनेरचे प्रा. रमेश माने परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
विजेत्यांना रोख पारितोषिके
वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ९ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास ७ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी २ हजार रुपयांची असतील. विजेत्यांना स्मृतीचिन्ह, तर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या वैचारिक व सामाजिक सोहळ्यास नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक आणि पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील व सचिव संदीप घोरपडे यांनी केले आहे.

Oplus_131072

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed