अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना ग्राम महसूल अधिकाऱ्याला धडक अमळनेरच्या पैलाड भागातील घटना; वाहनचालक वाहनासह पसार.

0

अमळनेर /आबीद शेख

अमळनेर : अमळनेर शहरातील पैलाड भागात श्रीकृष्ण मंदिराजवळ आज दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ११.४५ वाजेच्या सुमारास वाळूने भरलेल्या, वाहन नोंदणी क्रमांक नसलेल्या लाल रंगाच्या टेम्पोचा पाठलाग करत असताना ग्राम महसूल अधिकारी अदिती संतोष जरे यांना वाहनाने कट मारल्याने त्या दुचाकीसह खाली पडून जखमी झाल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वाहन वाळूची वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्राम महसूल अधिकारी अदिती जरे या दुचाकीवरून सदर वाहनाचा पाठलाग करीत होत्या. त्यावेळी श्रीकृष्ण मंदिराजवळ संबंधित टेम्पोच्या चालकाने वाहन अचानक कट मारल्याने जरे यांचा दुचाकीवरील ताबा सुटून त्या खाली पडल्या. या घटनेत त्यांना दुखापत झाली.

घटनेनंतर संबंधित वाहनचालकाने टेम्पो भरधाव वेगाने घटनास्थळावरून नेऊन पलायन केले. वाहनाचा नोंदणी क्रमांक उपलब्ध नसल्याने वाहनचालकाची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.

घटनेची माहिती मिळताच अमळनेर शहर पोलिसांनी घटनेची दखल घेतली असून, संबंधित वाहनचालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनेच्या अनुषंगाने वाहनचालकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीवर कारवाई करताना अशा प्रकारे हल्ला किंवा अडथळा निर्माण होण्याच्या घटना घडत असल्याने महसूल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed