कर्जवसुलीतील कथित गैरवर्तनाविरोधात शिवसेना-युवासेनेचे पोलिसांना निवेदन.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : बजाज फायनान्सच्या कर्जवसुली प्रक्रियेदरम्यान ग्राहकांना कथित धमकी, शिवीगाळ, अपमानास्पद भाषा आणि मानसिक त्रास दिल्याच्या तक्रारींची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले.

शिरूर येथील विनोद पाटील व अमळनेर येथील वाल्मीक चौधरी यांनी कर्जवसुलीच्या संदर्भात बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्यांकडून मानसिक त्रास, धमकी तसेच आक्षेपार्ह भाषेचा वापर झाल्याची तक्रार शिवसेना-युवासेना पदाधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने अमळनेर येथील बजाज फायनान्सचे मॅनेजर दीपक चौधरी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान उद्धट व आक्षेपार्ह पद्धतीने उत्तर मिळाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

कर्जाचा हप्ता थकीत असल्यास वित्तीय संस्थेला कायदेशीर चौकटीत राहून वसुली करण्याचा अधिकार आहे. मात्र, वसुली करताना ग्राहकांना धमकावणे, शिवीगाळ करणे, अपमानित करणे किंवा मानसिक दबाव आणणे योग्य नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांचे जबाब नोंदवावेत. तसेच उपलब्ध फोन कॉल रेकॉर्डिंग, ऑडिओ-व्हिडिओ पुरावे आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून, कायद्याचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
भविष्यात कर्जवसुलीच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना धमकी, शिवीगाळ अथवा मानसिक त्रास दिला जाऊ नये, यासाठी संबंधित वित्तीय संस्थेला आवश्यक त्या सूचना देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
“ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि त्यांना कायदेशीर मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना-युवासेना ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील. ग्राहकांशी अरेरावी किंवा गैरवर्तन झाल्यास कायदेशीर व लोकशाही मार्गाने तीव्र निषेध नोंदविला जाईल,” असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.
निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख गुलाब काशिनाथ पाटील, युवासेना तालुकाप्रमुख राहुल भास्कर कंजर, युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण पुरुषोत्तम पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख पंकज संतोष शेटे, उपतालुकाप्रमुख राहुल साहेबराव पाटील, उपतालुकाप्रमुख जयेश रवींद्र चव्हाण, युवासेना उपशहरप्रमुख राजा अल्ताफ राजा शेख, युवासेना पदाधिकारी ईश्वर जाधव, सचिन विलास पाटील व प्रदीप किरण देशमुख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
— शिवसेना व युवासेना, अमळनेर

