धरती आबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अमळनेरात अभिवादन; आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर मंथन आदिवासी विकास सामाजिक परिषदेचा उपक्रम; जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांच्या लढ्याला उजाळा.

0

अमळनेर/ आबिद शेख

अमळनेर : आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध क्रांतीची मशाल पेटवणारे महानायक धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर रोजी अमळनेर येथे त्यांना अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली. आदिवासी विकास सामाजिक परिषदेच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले.

भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांच्या अन्यायकारक राजवटीविरोधात आदिवासी समाजाला संघटित करून ऐतिहासिक ‘उलगुलान’ आंदोलनाचे नेतृत्व केले होते. जल, जंगल आणि जमिनीवरील आदिवासींचे पारंपरिक अधिकार अबाधित राहावेत, समाजाची संस्कृती आणि अस्मिता टिकून राहावी, यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य संघर्षात घालवले. त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा आणि त्यागाचा वारसा आजही आदिवासी समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

यावेळी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, माजी नगरसेवक सलीम टोपी, माजी नगराध्यक्ष सुभाष अण्णा चौधरी, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण बैसाणे, पत्रकार ईश्वर महाजन, आदिवासी नेते आप्पा दाभाडे, मुकेश बिऱ्हाडे, दयाराम मोरे (बहादरवाडी), विनोद मोरे (खडके), सुदाम वाघ (कलाली), सुधाकर बागुल (कलाली), सुरेश भिल (देवळी), राजेंद्र वाघ (देवळी), रामदास ढालवाले, पप्पू लोंढे, रमेश सोनवणे (मुडी), दशरथ पवार (दरेगाव), वसंत जाधव, ज्योतीबाई पारधी, उषाबाई भिल, हिराबाई पारधी, कल्याणी पारधी, रमेश लोंढे, प्रभू कसबे, भावराव फुलपगारे आणि मोतीराम हातांगडे यांच्यासह आदिवासी विकास सामाजिक परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिवादन कार्यक्रमानंतर आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. समाजातील शैक्षणिक मागासलेपणा दूर करणे, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे तसेच आदिवासींच्या पारंपरिक हक्कांचे संरक्षण करणे, या महत्त्वपूर्ण विषयांवर उपस्थितांनी आपली मते मांडली. भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed