मंगलमूर्ती चौकात बेशिस्त पार्किंगचा त्रास; वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण! प्रबुद्ध विहार परिसरात अपघातांचा धोका वाढला; वाहतूक पोलिसांची नियुक्ती करून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी.
अमळनेर/ आबिद शेख 
अमळनेर : शहरातील कचेरी रोड ते गलवाडे रोड या मार्गावरील मंगलमूर्ती चौक आणि प्रबुद्ध विहार परिसरात बेशिस्त वाहन पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुचाकी व चारचाकी वाहने मनमानी पद्धतीने उभी केली जात असल्याने वाहतुकीचा मार्ग अरुंद झाला असून, या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत आहे.
मंगलमूर्ती चौक हा शहरातील महत्त्वाचा आणि सतत वर्दळ असलेला मार्ग आहे. या रस्त्यावरून दिवसभर मोठ्या संख्येने वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र, रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या वाहनांमुळे इतर वाहनचालकांना मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी पादचाऱ्यांनाही सुरक्षितपणे रस्ता ओलांडणे कठीण झाले आहे.

विशेष म्हणजे प्रबुद्ध विहार परिसरात बेशिस्त पार्किंगमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. गर्दीच्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने स्थानिक रहिवासी, व्यापारी आणि वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी वाहतूक विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मंगलमूर्ती चौक आणि प्रबुद्ध विहार परिसरात वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची नियमित नियुक्ती करावी, बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करावी तसेच या भागात नियमित गस्त वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका लक्षात घेता प्रशासनाने एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता वेळीच कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
