पानखिडकी मारामारी प्रकरणात जय बजरंग मित्र मंडळाचा विनाकारण उल्लेख; खोटा गुन्हा दाखल केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना ६१ कार्यकर्त्यांचे निवेदन; हरीश भावसार व साक्षीदारांची चौकशी करण्याची मागणी.
अमळनेर/आबिद शेख 
अमळनेर : शहरातील पानखिडकी परिसरात झालेल्या मारामारीच्या प्रकरणात जय बजरंग मित्र मंडळाचे नाव विनाकारण गोवण्यात आल्याचा आरोप मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. स्वतःविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हरीश भावसार यांनी पोलिसांची दिशाभूल करून खोटा गुन्हा दाखल केल्याचा दावा करत मंडळाच्या ६१ कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, हरीश भावसार यांचा जय बजरंग गणेश मंडळाच्या आर्थिक हिशोबाशी कोणताही संबंध नाही. त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे तसेच सौरभ याच्याशी असलेल्या वादातून त्यांनी पोलिसांना चुकीची माहिती देत जय बजरंग मंडळाचे नाव या प्रकरणात गोवले आहे. यामुळे सामाजिक व धार्मिक कार्य करणाऱ्या मंडळाची आणि गणेशोत्सवाची समाजात बदनामी होत असल्याचे कार्यकर्त्यांनी नमूद केले आहे.
मंडळाच्या आर्थिक हिशोबाबाबत कोणताही वाद नसून, संबंधित व्यक्तींच्या आपापसातील भांडणात मंडळाचा किंवा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासादरम्यान मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनाकारण त्रास देऊ नये, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
तसेच हरीश भावसार आणि संबंधित साक्षीदारांची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी व योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर नगरसेवक गोपी कासार, जितेंद्र पवार, कमलेश गुरव, निखिल चौधरी, गणेश चौधरी, मुकेश पाटील, श्रीकांत करंजे, दिनेश सैंदाणे, हर्षल विसपुते, राज गोलेच्छा, चेतन चौधरी, मनोज पाटील, अमोल चौधरी, हर्षल भावसार, रितेश चौधरी, गणेश जाधव, परेश भामरे, रवींद्र बारी, ऋषिकेश बारी, महेश करंजे, प्रसाद करंजे, प्रशांत चौधरी, वैभव खैरनार यांच्यासह एकूण ६१ मंडळ कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

