सिमेंटच्या ट्रेलरला अचानक आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : शहरातील विजय मारुती मंदिरासमोर आज रात्री सुमारे ८.०७ वाजता सिमेंटच्या मोठ्या ट्रेलरला अचानक आग लागल्याची घटना घडली. वाहन क्रमांक NL 01 AH 2515 असलेल्या ट्रेलरच्या टायरचा लाइनर चिपकल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

या घटनेची माहिती श्री. अमोल माळी सर यांनी तात्काळ अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी कोणताही विलंब न करता घटनास्थळी दाखल झाले. ट्रेलरला लागलेली आग वाढण्यापूर्वीच अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले आणि संपूर्ण आग विझवली.

आग मोठ्या प्रमाणात पसरली असती तर वाहनासह परिसरातील इतर वाहनांना तसेच नागरिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र, अग्निशमन दलाच्या तत्पर प्रतिसादामुळे मोठा अनर्थ टळला.
या आग विझविण्याच्या कारवाईत अग्निशमन दलाचे कर्मचारी फारुक शेख, दिनेश बिऱ्हाडे, रफिक पठाण, आकाश संदानशिव आणि आकाश बाविस्कर यांनी सक्रिय सहभाग घेत आग पूर्णपणे नियंत्रणात आणली.
घटनेनंतर काही काळ परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. अग्निशमन दलाच्या वेळीच केलेल्या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

