चालत्या कारला अचानक आग; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला! महाराणा प्रताप चौकातील घटना; इस्लामपुरा, मंगलादेवी चौकातील युवकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आग विझविण्यासाठी केले शर्थीचे प्रयत्न.
अमळनेर /आबिद शेख 
अमळनेर : शहरातील महाराणा प्रताप चौकात अॅक्सिस बँकेसमोर काल रात्री अचानक चालत्या कारने पेट घेतल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या इस्लामपुरा, मंगलादेवी चौक परिसरातील नागरिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखत आग विझविण्यासाठी धाव घेतली.

कारला आग लागल्याचे लक्षात येताच उपस्थितांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. कुणी पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला, तर कुणी माती टाकून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. काही नागरिकांनी कारमधील कुटुंबीयांना सुरक्षितपणे बाजूला केले. अनेकांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यामुळे अखेर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

या घटनेत आग विझविण्याचा प्रयत्न करताना काही नागरिकांचे हात किरकोळ भाजले. मात्र, सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. नागरिकांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.
संकटाच्या वेळी कोणतीही अपेक्षा न ठेवता नागरिकांनी एकत्र येऊन केलेले मदतकार्य कौतुकास्पद ठरत असून, त्यांच्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
