अमळनेरात आर. बी. पाटील इन्फ्रास्ट्रक्चर व जयनिल फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण; राष्ट्रप्रगतीसाठी योगदान देण्याचा संकल्प.

0

अमळनेर/आबिद शेख
अमळनेर : देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत आर. बी. पाटील इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. आणि जयनिल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.


देवगाव-देवळी, अमळनेर येथील आर. बी. पाटील इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.च्या बेस कॅम्प येथे सकाळी ८ वाजता स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. श्रीमती पुष्पाबाई भाईदास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.


ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर वातावरणात स्वातंत्र्यदिनाचा आनंद साजरा केला. यावेळी स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करण्यात आले.
कार्यक्रमाला माजी नगराध्यक्षा सौ. जयश्री अनिल पाटील, हिंगोणे येथील लोकनियुक्त सरपंच श्रीमती राजश्री राजेश पाटील, जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील, उपाध्यक्ष वरुण राजेश पाटील यांच्यासह जयनिल फाऊंडेशनचे सदस्य तसेच आर. बी. पाटील इन्फ्रास्ट्रक्चरचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार अनिल पाटील यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागाची जाणीव ठेवून स्वातंत्र्याची जपणूक करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्राच्या विकासात प्रत्येकाने आपल्या परीने योगदान देत देशाला प्रगतीच्या दिशेने पुढे नेण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि एकजुटीचा संदेश देण्यात आला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed