धुळ्यातील पाच सुरक्षा रक्षकांच्या नोंदणीसाठी ७.५० लाखांची लाच; ४.८० लाख स्वीकारताना खासगी सिक्युरिटी सुपरवायझरला रंगेहाथ पकडले.

0

24 प्राईम न्यूज 13 Aug 2026


जळगाव : धुळे जिल्हा परिषदेत कार्यरत पाच सुरक्षा रक्षकांची सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणी करून देण्यासाठी तब्बल ७ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात तडजोडीनंतर उर्वरित ४ लाख ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना खासगी सिक्युरिटी सुपरवायझरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पारोळा येथील हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडले. ही कारवाई १२ ऑगस्ट रोजी करण्यात आली.


या प्रकरणात पुरुषोत्तम मंगाजी वाघ (वय ५०), फिटर, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, धुळे आणि बारकु काळू पाटील (वय ६०), खासगी सिक्युरिटी एजन्सीतील सुपरवायझर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
तक्रारदार हे मागील १४ महिन्यांपासून धुळे जिल्हा परिषदेत तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत.

शासनाच्या नियमानुसार सुरक्षा रक्षक म्हणून सलग ६० दिवस काम केल्यानंतर सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणी करण्याची प्रक्रिया केली जाते. तक्रारदारासह अन्य चार सुरक्षा रक्षकांची नोंदणी करून देण्यासाठी आरोपींनी प्रत्येकी १ लाख ५० हजार रुपये याप्रमाणे एकूण ७ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यापैकी तक्रारदाराने यापूर्वी १ लाख रुपये दिले होते. मात्र, त्यानंतरही काम न झाल्याने तक्रारदाराने ८ ऑगस्ट रोजी आरोपी पुरुषोत्तम वाघ यांची भेट घेऊन कामाबाबत विचारणा केली. त्यावेळी उर्वरित ६ लाख ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. याबाबत तक्रारदाराने ११ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या अनुषंगाने ११ व १२ ऑगस्ट रोजी पंचांच्या उपस्थितीत पडताळणी करण्यात आली. त्यावेळी आरोपींनी यापूर्वी १ लाख रुपये स्वीकारल्याचे मान्य करून उर्वरित रक्कम मागितली. तडजोडीनंतर ५ लाख ८० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यापैकी यापूर्वी दिलेले १ लाख रुपये वजा करून उर्वरित ४ लाख ८० हजार रुपये बारकू पाटील यांच्याकडे देण्यास सांगण्यात आले.
त्यानुसार १२ ऑगस्ट रोजी पारोळा शहरातील हॉटेल ग्रीन पार्क येथे सापळा रचण्यात आला. यावेळी खासगी इसम बारकू पाटील यांनी पंचांसमक्ष ४ लाख ८० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. आरोपी पुरुषोत्तम वाघ यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ७, ७-अ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी पर्यवेक्षण केले. पथकात पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही लोकसेवक लाचेची मागणी करत असल्यास किंवा भ्रष्टाचारासंबंधी माहिती असल्यास नागरिकांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.

Oplus_131072

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed