अंतर्ली येथे बियाण्याच्या उगवण क्षमतेवर प्रश्नचिन्ह; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान! बॉम्बे सुपर डॉलर हरभरा बियाण्याची केवळ ३० टक्के उगवण झाल्याचा आरोप; कृषी विभागाकडे पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी.

0

अमळनेर/ आबिद शेख

अमळनेर : तालुक्यातील अंतर्ली येथील महिला शेतकरी सौ. हेमांगी पवन पाटील यांनी हरभरा बियाण्याच्या निकृष्ट दर्जाबाबत कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. बॉम्बे सुपर कंपनीच्या डॉलर हरभरा बियाण्याची पेरणी करूनही केवळ ३० टक्के उगवण झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सौ. हेमांगी पाटील यांनी आपल्या मालकीच्या शेतातील गट क्रमांक २८ मधील क्षेत्रावर दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी डॉलर हरभऱ्याची लागवड केली होती. सदर बियाणे त्यांनी अमळनेर येथील किरण अ‍ॅग्रो एजन्सीकडून खरेदी केले होते. बॉम्बे सुपर कंपनीचे ७० किलो वजनाचे बियाणे खरेदी करण्यासाठी त्यांनी सुमारे ३८ हजार ९०० रुपये खर्च केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

 

पेरणीपूर्वी शेतात पाणी भरून योग्य मशागत करूनही बियाण्याची अपेक्षित उगवण झाली नाही. शेतात केवळ ३० टक्केच उगवण झाल्याने उर्वरित क्षेत्रावर पुन्हा रोटाव्हेटर मारून दुबार पेरणी करण्याची वेळ येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासाठी अंदाजे एक लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त खर्च अपेक्षित असल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

यंदा आधीच शेतीची परिस्थिती प्रतिकूल असताना बियाण्याच्या निकृष्ट दर्जामुळे संपूर्ण हंगाम वाया जाण्याची भीती शेतकरी महिलेने व्यक्त केली आहे. संबंधित बियाणे दोषपूर्ण अथवा भेसळयुक्त असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी तहसीलदार, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.

तालुका कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात येऊन पाहणी करावी, उगवण क्षमतेबाबत पंचनामा करावा आणि झालेल्या नुकसानीची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, तसेच नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी सौ. हेमांगी पवन पाटील यांनी केली आहे.

बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेत्याची आणि संबंधित कंपनीची बाजूही तपासून कृषी विभागाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed