मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांना हिरवा कंदील; अमळनेरच्या रेणुकाताई पाटील यांची मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा! ग्रामीण विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली; शिष्टमंडळातील एकमेव महिला प्रतिनिधी म्हणून रेणुकाताईंनी मांडल्या २० प्रमुख मागण्या.

0

अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) तसेच इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना अखेर शासनदरबारी वाचा फुटली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीत अमळनेर तालुक्यातील उदयनगर (डांगर बुद्रुक) येथील विद्यार्थी प्रतिनिधी रेणुकाताई पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची प्रभावीपणे मांडणी केली.

मुंबई येथील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विद्यार्थी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाची सविस्तर बैठक पार पडली. या बैठकीपूर्वीच रेणुकाताई पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या २० प्रमुख मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले होते. विशेष म्हणजे, या शिष्टमंडळातील त्या एकमेव महिला प्रतिनिधी होत्या.

बैठकीत रेणुकाताईंनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीदरम्यान भेडसावणाऱ्या अडचणी, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता, भरतीमधील विलंब, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क आणि परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेचे प्रश्न ठामपणे मांडले.

२० मागण्यांच्या निवेदनातून परीक्षा व्यवस्थेत बदलाची मागणी

रेणुकाताई पाटील यांनी सादर केलेल्या निवेदनात कथित पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, ७० हजार पदांची भरती सुरू करणे, MPSCच्या सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेणे, गट-अ व गट-बच्या पदांमध्ये वाढ, परीक्षा शुल्कात सवलत, वयोमर्यादेत शिथिलता, आयोगाची पुनर्रचना आणि UPSCच्या धर्तीवर वार्षिक परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.

याशिवाय तक्रार निवारण कक्षाची स्थापना, महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा कायदा २०२४ ची प्रभावी अंमलबजावणी, प्रश्नपत्रिका निर्मितीपासून वितरणापर्यंत सुरक्षित व्यवस्था, One Time Exam Fee, व्ही. राधा समितीचा अहवाल जाहीर करणे, डिजिटल ऑडिट ट्रेल आणि स्वतंत्र गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा निर्माण करण्यासह विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश होता.

मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाच्या मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका

बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले. MPSC सचिवांची बदली, परीक्षा ऑफलाइन पद्धतीने कायम ठेवणे, गट-कच्या पदांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करणे, पुढील तीन वर्षांतील रिक्त पदांची माहिती जाहीर करणे आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणणे यासारख्या मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात आली. इतर मागण्यांवरही शासनस्तरावर कार्यवाही करण्याबाबत चर्चा झाली.

आश्वासनांची प्रभावी अंमलबजावणी होणे अपेक्षित

यावेळी प्रतिक्रिया देताना रेणुकाताई पाटील म्हणाल्या की, लोकसेवा आयोगाच्या कामकाजात पारदर्शकता आणि विश्वासार्हता असणे अत्यंत आवश्यक आहे. पेपरफुटीच्या कथित प्रकरणांसह विविध प्रश्नांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या २० प्रमुख मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.

महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी अनेक वर्षांपासून मेहनत घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. त्यांच्या कष्टांना न्याय मिळावा आणि परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा दृढ व्हावा, यासाठी शासनाने दिलेल्या आश्वासनांची वेळेत अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

अमळनेर तालुक्यातील उदयनगरसारख्या ग्रामीण भागातून पुढे येत राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम रेणुकाताई पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या पुढाकाराचे परिसरातून कौतुक होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल रेणुकाताई पाटील यांनी त्यांचे आभार मानले.

—

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed