४० हजार मतदार ASD यादीत; पात्र मतदारांनी घाबरू नये, BLOशी संपर्क साधा.
अमळनेर /आबिद शेख.

निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत अमळनेर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीची पडताळणी व अद्ययावतीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांच्या माध्यमातून घराघरांत जाऊन मतदारांची माहिती संकलित करण्यात आली असून, सुमारे ४० हजार मतदारांची नावे ASD यादीत आल्याने प्रशासनाकडून या नोंदींची पडताळणी केली जात आहे.

ASD म्हणजे Absent, Shifted and Deceased अर्थात गैरहजर, स्थलांतरित आणि मयत मतदारांची यादी. या यादीतील प्रत्येक नोंदीची प्रत्यक्ष तपासणी करून पात्र मतदारांचे नाव कायम ठेवणे, तर अपात्र, मृत किंवा स्थलांतरित मतदारांच्या नोंदी नियमानुसार वगळणे, अशी कार्यवाही करण्यात येत आहे.

दरम्यान, ASD यादीत नाव आलेल्या मात्र सध्या अमळनेर विधानसभा मतदारसंघात वास्तव्यास असलेल्या पात्र मतदारांनी घाबरून न जाता संबंधित BLOशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. संबंधित मतदारांनी आवश्यक माहिती व पुरावे सादर केल्यास त्यांचे नाव मतदार यादीत कायम ठेवण्यासाठी कार्यवाही केली जाणार आहे.
नागरिकांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे मतदार यादीत आहेत की नाहीत, याचीही खात्री करावी. ASD यादीत स्वतःचे किंवा कुटुंबातील पात्र सदस्याचे नाव असल्यास १७ ऑगस्टपर्यंत संबंधित BLOकडे आवश्यक कागदपत्रे व माहिती सादर करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
स्थलांतरानंतर जुन्या ठिकाणी कायम असलेल्या मतदारांच्या नोंदी, मृत व्यक्तींची नावे तसेच संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष वास्तव्य नसलेल्या मतदारांची माहिती तपासली जात आहे. पात्र मतदाराचे नाव चुकीने वगळले जाऊ नये आणि मतदार यादीतील अपात्र नोंदी दूर होऊन यादी अधिक अचूक व्हावी, यासाठी नागरिकांनी SIR मोहिमेत सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांनी केले आहे.

