सात्री पुनर्वसनाचा २६ वर्षांचा प्रश्न मार्गी लावा; डॉ. दीपक पाटील यांची उप मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी.
अमळनेर/आबिद शेख

कळमसरे (ता. अमळनेर) : सात्री गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न तब्बल २६ वर्षांपासून रखडला असून, शासनाने या प्रश्नावर तातडीने ठोस निर्णय घेऊन ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी पंचायत समिती सभापती तथा शिवसेना अमळनेरचे माजी संघटक आणि शेतकरी सेना अध्यक्ष डॉ. दीपक पंढरीनाथ पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

११ ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनातून त्यांनी सात्री गावातील नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले. पुनर्वसनासाठी शासनाने यापूर्वी जमीन संपादित केली असतानाही २६ वर्षांनंतर अनेक कुटुंबांना घरांसह आवश्यक मूलभूत सुविधा मिळालेल्या नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
पुनर्वसनाची प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांना अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे. २७ मे २०२२ रोजीच्या पत्रानुसार वाटप प्रक्रिया स्थगित करून पुन्हा सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, इतका कालावधी उलटूनही सर्वेक्षण पूर्ण झालेले नसल्याने पुन्हा नव्याने सर्वेक्षणाची आवश्यकता काय, असा सवाल डॉ. पाटील यांनी उपस्थित केला आहे.

पांझरा नदीवर केटीवेअर बंधाऱ्यांची मागणी
सात्री पुनर्वसनासोबतच पांझरा नदीवर मंडळ, मुडी आणि शहापूर येथे केटीवेअर बंधारे उभारून नदीचे पाणी अडवावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. या बंधाऱ्यांमुळे परिसरातील पाणीटंचाई कमी होऊन शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होईल, असे डॉ. पाटील यांनी म्हटले आहे.
जलसंपदा विभाग, जळगाव यांच्यामार्फत संबंधित ठिकाणांचे सर्वेक्षण करून प्रस्तावित बंधाऱ्यांच्या कामांना गती देण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. सात्री गावाचा पुनर्वसन प्रश्न तसेच पांझरा नदीवरील बंधाऱ्यांचा प्रश्न शासनाने गांभीर्याने घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी डॉ. पाटील यांनी केली आहे.

