नांदेडमध्ये प्रथमच ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांचे मार्गदर्शन ‘खुशनुमा जीवन – जीवन जगण्याची कला’ विषयावर विशेष आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन.

नांदेड : आधुनिक जीवनशैलीतील वाढता ताणतणाव, धावपळ आणि स्पर्धेमुळे मानवी जीवनातील मानसिक शांतता व आनंद हरवत चालला आहे. अशा परिस्थितीत जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची आणि प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहण्याची कला आत्मसात करण्याच्या उद्देशाने नांदेड येथे प्रथमच ब्रह्माकुमारीज परिवाराच्या वतीने विशेष आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या प्रेरणादायी विचारांनी ओळख निर्माण केलेल्या जीवन व्यवस्थापनतज्ज्ञ ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. ‘खुशनुमा जीवन – जीवन जगण्याची कला’ या विषयावर त्या जीवन आनंदी, समाधानी आणि तणावमुक्त बनविण्याचा आध्यात्मिक दृष्टिकोन उलगडून सांगणार आहेत.
मनातील नकारात्मक विचारांवर नियंत्रण मिळविणे, स्वभावात सकारात्मक बदल घडविणे, आत्मविश्वास आणि आत्मिक शक्ती वाढविणे, तसेच कौटुंबिक नात्यांमध्ये प्रेम, विश्वास आणि आपुलकी निर्माण करणे, अशा विविध विषयांवर शिवानी दीदी मार्गदर्शन करणार आहेत.
परिस्थिती बदलण्यापेक्षा स्वतःच्या विचारांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणल्यास जीवन अधिक सुंदर आणि आनंददायी होऊ शकते, हा या कार्यक्रमाचा मुख्य संदेश आहे. राजयोग, सकारात्मक चिंतन आणि आत्मजागृतीच्या माध्यमातून आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा या प्रवचनातून मिळणार आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक :
मंगळवार, दिनांक १७ नोव्हेंबर २०२६ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती, मैदान, नांदेड येथे हा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ४.३० ते ६ वाजेपर्यंत सुरेल संगीत कार्यक्रम, तर सायंकाळी ६ ते ७.३० वाजेपर्यंत ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांचे विशेष प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.
या प्रेरणादायी कार्यक्रमाचा लाभ नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा. तसेच कुटुंबीयांसह उपस्थित राहून आनंदी, समाधानी आणि सकारात्मक जीवन जगण्याची कला जाणून घ्यावी, असे आवाहन ब्रह्माकुमारीज परिवार, नांदेड ब्रह्माकुमारिज वसंत नगर, ब्रह्माकुमारिज कैलास नगर व ब्रह्माकुमारिज फरांदे पार्क परिवारा तर्फे करण्यात आले आहे
