भोकर धरणाजवळील अपघातानंतर बॅरिकेट्सची जागा बदलली; नागरिकांचा संतप्त सवाल मंगेश जगताप यांच्या मृत्यूनंतरच कंपनीला आली जाग? आधीच उपाययोजना केल्या असत्या तर दुर्घटना टळली असती!
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : पारोळा-अमळनेर मार्गावरील भोकर धरणाजवळ सुरू असलेल्या अपूर्ण रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. आर. बी. पाटील इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून करण्यात आलेल्या बॅरिकेट्सच्या नियोजनावर यापूर्वीच नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत होती. मात्र, या धोकादायक परिस्थितीकडे वेळीच लक्ष न दिल्याने एका निष्पाप व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री साडेनऊच्या सुमारास रुबजीनगर, अमळनेर येथील मंगेश जगताप यांचा भोकर धरणाजवळ झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून जगताप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अपघातानंतरच बॅरिकेट्सच्या व्यवस्थेत बदल!
मंगेश जगताप यांच्या मृत्यूनंतर संबंधित कंपनीकडून बॅरिकेट्सची जागा बदलून ते कपचीच्या ढिगाऱ्यापुढे लावण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अपघात होण्यापूर्वीच ही खबरदारी का घेण्यात आली नाही? धोकादायक ठिकाणी योग्य बॅरिकेट्स, दिशादर्शक फलक आणि रात्री वाहनचालकांना स्पष्ट दिसतील असे रिफ्लेक्टर लावण्याची जबाबदारी कोणाची होती, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
अपूर्ण कामामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात!
रस्त्याचे काम सुरू असताना संबंधित ठिकाणी सुरक्षित वाहतुकीचे नियोजन करणे अत्यावश्यक असते. विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना रस्त्यावरील अडथळे स्पष्ट दिसावेत, यासाठी पुरेशी प्रकाशव्यवस्था, धोक्याचे संकेत आणि योग्य ठिकाणी बॅरिकेट्स असणे गरजेचे आहे. मात्र, भोकर धरणाजवळील परिस्थितीने या सुरक्षाव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
जबाबदारी निश्चित करून चौकशी करण्याची मागणी
अपघातानंतर बॅरिकेट्सची जागा बदलणे ही केवळ तात्पुरती उपाययोजना ठरू नये. अपघातापूर्वी सुरक्षिततेच्या उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत, कामाच्या ठिकाणी सुरक्षेची पाहणी कोणी केली होती आणि या दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या बाबी कोणत्या, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
मंगेश जगताप यांचा जीव गेल्यानंतरच संबंधित यंत्रणेला जाग आली का? वेळेत योग्य खबरदारी घेतली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती का? या प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे. भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी आर. बी. पाटील इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आणि संबंधित रस्ते प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

