महिलांसाठी ‘लाडकी बहीण हॉस्पिटल’चा मानस; पदभाराच्या मुद्द्यावर पालिका सभेत खडाजंगी.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महिलांसाठी स्वतंत्र आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘लाडकी बहीण हॉस्पिटल’ सुरू करण्याचा मानस नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी व्यक्त केला. शहरातील विकासकामे, पाणीपुरवठा, शिक्षण, पूरस्थिती आणि प्रशासकीय विषयांसह जवळपास १०० विषयांवर सभेत चर्चा होऊन विविध ठरावांना मंजुरी देण्यात आली. दरम्यान, एका कर्मचाऱ्याकडील विभागाचा पदभार काढण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला.

मंगळवारी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर होते. रस्ते व गटारींचे काँक्रीटीकरण, पाणीपुरवठा, पथदिवे, स्मशानभूमी, शहर सुशोभीकरण, भुयारी गटार योजना, आपत्ती व्यवस्थापन आणि विविध शासकीय योजनांबाबत चर्चा करण्यात आली.
महिलांसाठी स्वतंत्र आरोग्य सुविधा

महिलांना आवश्यक आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी, यासाठी ‘लाडकी बहीण हॉस्पिटल’ सुरू करण्याचा मानस नगराध्यक्ष डॉ. बाविस्कर यांनी व्यक्त केला. या उपक्रमासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालिका शाळांचा दर्जा उंचावण्यावर भर
पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी सीबीएसई पॅटर्नच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शिक्षण सभापती नाविद शेख यांनी मांडली. शाळांमधील शैक्षणिक सुविधा सुधारून पालिका शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढविण्यासाठी विशेष नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
कर्मचाऱ्याच्या पदभारावरून वातावरण तापले
सभेच्या सुरुवातीलाच एका नगरपालिका कर्मचाऱ्याकडील विभागाचा पदभार काढण्याच्या विषयावरून वाद निर्माण झाला. डॉ. दिगंबर महाले यांनी संबंधित कर्मचाऱ्याचा पदभार काढण्याचे कारण विचारले. मात्र, हा विषय सभेच्या अजेंड्यावर नसल्याने त्यावर नंतर चर्चा करावी, अशी भूमिका अनिल महाजन व पंकज चौधरी यांनी घेतली. यावरून सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.
मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी काही व्यापाऱ्यांकडून संबंधित कर्मचाऱ्याविरोधात तक्रारी प्राप्त झाल्याने त्याच्याकडील एक पदभार काढण्यात आल्याचे स्पष्ट केले.
पूरग्रस्तांना घरपट्टीत सवलतीची मागणी
अलीकडील पुरामुळे शहरातील अनेक नागरिकांचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी घरपट्टी माफ करण्याची मागणी सभेत करण्यात आली. तसेच शहरातील नैसर्गिक नाले व ओढ्यांचे संरक्षण, अतिक्रमणे हटविणे आणि भविष्यातील पूरस्थिती रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावरही चर्चा झाली.
नाल्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासह पूरप्रतिबंधक उपाययोजनांसाठी प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी सांगितले.
जन्म-मृत्यू दाखला, कलर प्रिंटसाठी ५० रुपये शुल्क
जन्म-मृत्यू दाखला तसेच कलर प्रिंटसाठी ५० रुपये शुल्क आकारण्याच्या प्रस्तावालाही सभेने मंजुरी दिली. यासह शहरातील विविध विकासकामे, पालिकेच्या मालकीच्या जागा, मालमत्ता आणि आगामी प्रकल्पांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
विविध विकासकामे आणि प्रशासकीय विषयांवरील चर्चा व ठरावांना मंजुरी देत सर्वसाधारण सभा पार पडली.

