कळमसरे येथे संत सावता माळी पुण्यतिथी सोहळा उत्साहात आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या २० लाखांच्या सभामंडपाचे लोकार्पण.
अमळनेर/आबिद शेख

कळमसरे (ता. अमळनेर) : कर्मालाच ईश्वरसेवा मानणारे संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कळमसरे येथे धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन उत्साहात करण्यात आले. यावेळी माळी समाजासाठी सुमारे २० लाख रुपये निधीतून उभारण्यात आलेल्या नवीन सभामंडपाचे लोकार्पण करण्यात आले.

आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या या सभामंडपामुळे माळी समाजासह परिसरातील नागरिकांना सामाजिक, सांस्कृतिक आणि विविध सार्वजनिक कार्यक्रमांसाठी हक्काची व कायमस्वरूपी जागा उपलब्ध झाली आहे.

कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, सात्रीचे माजी सरपंच महेंद्र बोरसे, जयनील फौंडेशनचे अध्यक्ष गौतम पाटील, खान्देश माळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मुरलीधर महाजन, माजी सरपंच जगदीश निकम, जी. टी. टाक, माजी उपसरपंच जितेंद्र राजपूत, प्राचार्य विकास महाजन, माळी पंच मंडळाचे अध्यक्ष सुदाम चौधरी, शत्रुघ्न पाटील, सेवानिवृत्त ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानेश्वर पाटील, सर्जेराव पाटील, अशोक चौधरी, मुरलीधर चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग
संत सावता माळी पुण्यतिथी सोहळ्यास माळी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत सावता माळी यांच्या कार्याला अभिवादन केले. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी संत सावता माळी यांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. रात्री साडेआठ वाजता ह.भ.प. भूषण महाराज चौगावकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला.
कर्तृत्ववान समाजबांधवांचा गौरव
कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माळी समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या समाजबांधवांच्या कार्याचा गौरव झाल्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
नवीन सभामंडपामुळे भविष्यात माळी समाजाच्या विविध उपक्रमांना कायमस्वरूपी व्यासपीठ मिळणार असून, सामाजिक, सांस्कृतिक आणि समाजोपयोगी कार्यक्रमांसाठी ही वास्तू महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. संजय महाजन यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. हिरालाल पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माळी पंच मंडळाचे संचालक मंडळ, समाजबांधव तसेच शारदा माध्यमिक विद्यालयाच्या लेझिम पथकाने सहकार्य केले.

