दिवाळीच्या सुट्टीत तरुणांचे सामाजिक भान! श्रमदानातून प्रगणे डांगरी-मारवड रस्त्यावरील खड्डे बुजविले प्रशासनाची वाट न पाहता युवकांचा पुढाकार; एकजुटीतून सामाजिक बांधिलकीचे दर्शन.
अमळनेर/आबिद शेख

प्रगणे डांगरी : दिवाळीची सुट्टी म्हटली की आनंद, उत्साह आणि मौजमजा; मात्र या सुट्टीचा उपयोग समाजहिताच्या कामासाठी करत प्रगणे डांगरी येथील तरुणांनी एक आदर्श उपक्रम राबविला. प्रगणे डांगरी ते मारवड या रस्त्याची दुरवस्था झाल्याने ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनधारकांसह प्रवासी, विद्यार्थी, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.

रस्त्याच्या या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्याबरोबरच स्वतःहून काहीतरी करण्याचा निर्धार गावातील तरुणांनी केला. दिवाळीच्या सुट्टीत गावी आलेल्या युवकांनी गावातील इतर तरुणांना सोबत घेत कोणत्याही शासकीय मदतीची प्रतीक्षा न करता श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा उपक्रम राबविला. तरुणांनी एकत्र येत केलेल्या या कामामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमात रणधीर पाटील, विरभूषण पाटील, हर्षल पाटील, संदीप पाटील, संजय पाटील, दिनेश पाटील, हिलाल कोळी, लक्ष्मण पाटील, सचिन कोळी, सुनील वाडीले, निलेश पाटील, हंसराज पाटील, समाधान पाटील, सागर भोई, स्वप्निल कोळी, गोपाल पाटील, गजानन पाटील, दुर्गेश पाटील (राज), रोहित पाटील, राज वाघ, विशाल वाघ, जयेश कोळी, तुषार (ऋषि) पाटील, कल्पेश पाटील, हितेश पाटील, सौरव पाटील (ओम), यशोदीप पाटील (यश), आदित्य पाटील, गौरव (गोलू) कोळी, सार्थक पाटील, शिवा कोळी आणि धिरज कोळी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
केवळ समस्या मांडण्यापेक्षा तिच्या निराकरणासाठी स्वतः पुढाकार घेण्याची वृत्ती या तरुणांनी दाखवून दिली आहे. दिवाळीच्या आनंदोत्सवात सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत केलेल्या या श्रमदानाचे परिसरातून कौतुक होत असून, युवकांच्या एकजुटीचा आणि सामाजिक बांधिलकीचा हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
