अमळनेरच्या घराघरांत दिवाळीची रोषणाई, मात्र रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य! नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांची नाराजी; बंद पथदिवे तातडीने सुरू करण्याची मागणी.
अमळनेर/आबिद शेख 
अमळनेर : दिवाळीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना अमळनेर शहरातील अनेक रस्त्यांवरील पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधारातून मार्ग काढावा लागत आहे. घराघरांत पणत्या आणि विद्युत रोषणाईचा झगमगाट असताना सार्वजनिक रस्त्यांवर मात्र अंधाराचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसत आहे.

सणासुदीच्या दिवसांत बाजारपेठेत तसेच शहरातील विविध भागांत नागरिकांची वर्दळ वाढलेली असते. अशा परिस्थितीत रस्त्यांवरील पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून अपघात आणि सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होत आहे.
शहरातील सार्वजनिक प्रकाशव्यवस्था सुरळीत ठेवणे ही नगरपरिषदेची मूलभूत जबाबदारी आहे. मात्र दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणातही पथदिव्यांची दुरुस्ती आणि देखभाल होत नसल्याने नगरपरिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नागरिक नियमितपणे कर भरत असताना त्यांना मूलभूत सुविधा मिळणार कधी, असा सवालही उपस्थित होत आहे. नगरपरिषद प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शहरातील बंद पथदिवे तातडीने सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
घराघरांत दिवाळीचा उजेड असताना शहराच्या रस्त्यांवर अंधार का? असा संतप्त सवाल अमळनेरकरांकडून उपस्थित केला जात आहे.
