हरित अमळनेरच्या दिशेने आणखी एक पाऊल! ‘हरित महाराष्ट्र अभियान’अंतर्गत अमळनेर नगरपरिषदेतर्फे भव्य वृक्षारोपण मोहीम; एस.टी. कॉलनी परिसरात अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : महाराष्ट्र शासनाच्या ‘हरित महाराष्ट्र अभियान’ तसेच ‘हरित महाराष्ट्र आयोग’ आणि जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या सूचनेनुसार अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने शहरात वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत सोमवार, दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी पिंपळे रोड येथील एस.टी. कॉलनी परिसरातील ओपन स्पेसमध्ये भव्य वृक्षारोपण मोहीम उत्साहात राबविण्यात आली.

अमळनेर शहर अधिक हिरवेगार, सुंदर आणि स्वच्छ करण्याच्या उद्देशाने नगरपरिषदेच्या माध्यमातून विविध भागांमध्ये वृक्षारोपण करण्यात येत आहे. नगराध्यक्षा व मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळे रोड, एस.टी. कॉलनी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण मोहिमेत नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी, महिला हौसिंग ट्रस्टचे पदाधिकारी, विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या उपक्रमात स्वच्छता निरीक्षक संतोष जाधव, स्वच्छता निरीक्षक किरण कंडारे, स्वच्छता निरीक्षक संतोष माणिक, प्र. मुकादम गौतम बिऱ्हाडे, शहर समन्वयक गणेश गढरी, अनंत संदानशिव, श्याम करंदीकर, सफाई कर्मचारी, महिला हौसिंग ट्रस्टचे पदाधिकारी, युनुस शेख, बाळकृष्ण जाधव, वसिम पठाण यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
विशेष म्हणजे पिंपळे रोड, एस.टी. कॉलनी परिसरातील उज्ज्वल फाऊंडेशन व स्वामी प्री स्कूलच्या विद्यार्थ्यांनीही वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणात प्रत्यक्ष सहभाग घेतल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
शहर हिरवेगार करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा
वाढते शहरीकरण, प्रदूषण आणि बदलते हवामान लक्षात घेता शहरातील हरित क्षेत्र वाढविणे ही काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेर नगरपरिषदेने ‘हरित महाराष्ट्र अभियान’ांतर्गत शहरातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
केवळ वृक्षारोपण करून थांबण्याऐवजी लावलेल्या रोपांचे संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारीही नागरिकांनी स्वीकारणे गरजेचे आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाने या अभियानात प्रत्यक्ष सहभाग नोंदविल्यास अमळनेर शहर अधिक हिरवेगार आणि पर्यावरणपूरक बनण्यास मोठी मदत होणार आहे.
‘हरित अमळनेर’साठी नागरिकांना आवाहन
अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने शहरातील नागरिकांना या वृक्षारोपण मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या परिसरात वृक्षलागवड करणे, लावलेल्या झाडांची नियमित देखभाल करणे आणि पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेणे, या माध्यमातून प्रत्येक नागरिक ‘हरित अमळनेर’च्या संकल्पनेत आपले योगदान देऊ शकतो.
अमळनेर शहर हरित, सुंदर व स्वच्छ करण्यासाठी नगरपरिषदेच्या या अभियानाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन प्रत्यक्ष सहभाग नोंदवावा, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

