पैसे लंपास करण्यासाठी ‘तेल गळती’चा बनाव; फळ व्यापाऱ्याची १२.५० लाखांची रोकड चोरी.
24 प्राईम न्यूज 6 Aug 2026

जळगाव : कारमधून तेल गळत असल्याचे सांगून अज्ञात चोरट्यांनी एका फळांच्या होलसेल व्यापाऱ्याची १२ लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल मंधान (वय ४४) हे कृषी उत्पन्न बाजार समिती, एमआयडीसी परिसरात फळांचे होलसेल व्यापारी आहेत. ३ ऑगस्ट रोजी विविध व्यापाऱ्यांकडून त्यांना सुमारे १३ लाख रुपयांची रोकड मिळाली होती. त्यापैकी ५० हजार रुपये वेगळे ठेवून उर्वरित १२ लाख ५० हजार रुपये त्यांनी एका बॅगेत भरून कारच्या मागील सीटवर ठेवले.

रात्री दुकान बंद करून ते घरी जात असताना घराजवळ कार उभी करताच काही अज्ञात व्यक्तींनी कारमधून तेल गळत असल्याचे सांगून त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवले. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी कारमधील रोकड असलेली बॅग चोरून नेली. घटनेनंतर पोलिसांनी चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.
