दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सुधारित NDRF निकषांनुसार मदत द्या; माजी आमदार कृषिभूषण यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी.

0

 

अमळनेर /आबिद शेख

 

 

खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या सुधारित राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) निकषांनुसार आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार कृषिभूषण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने खरीप हंगामासाठी राज्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच केंद्र शासनाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) अंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या दरांमध्ये सन २०२५-२६ ते २०२९-३० या कालावधीसाठी सुधारणा केली आहे.

या सुधारित निकषांनुसार शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांना जुन्या दरांऐवजी केंद्र शासनाच्या १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०३० या कालावधीसाठी लागू केलेल्या सुधारित NDRF निकषांनुसार आर्थिक मदत मंजूर करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

सदर निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जळगाव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, अमळनेर व एरंडोल उपविभागीय अधिकारी, अमळनेर तहसीलदार तसेच पारोळा तहसीलदार यांना माहिती व पुढील योग्य कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.

दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सुधारित निकषांनुसार वाढीव मदत मिळाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed