प्रस्तावित BHMS-CCMP नोंदणीला IMA अमळनेरचा विरोध; शासनाने प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी.

0

अमळनेर | आबिद शेख 


प्रस्तावित BHMS-CCMP नोंदणी प्रक्रियेविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) अमळनेर शाखेने महाराष्ट्र राज्य IMA, सेंट्रल MARD, ASMI तसेच विविध स्पेशालिस्ट संघटनांच्या राज्यव्यापी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. यासंदर्भात बुधवारी प्रांताधिकारी मयूर भांगळे यांना निवेदन देऊन शासनाने रुग्णहिताला प्राधान्य देत प्रस्तावित नोंदणी प्रक्रिया तात्पुरती स्थगित करावी, अशी मागणी करण्यात आली.


निवेदनात म्हटले आहे की, प्रस्तावित BHMS-CCMP नोंदणी प्रक्रियेसंदर्भात अद्याप स्पष्ट कायदेशीर, शैक्षणिक व नियामक चौकट उपलब्ध नसल्याने अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वैद्यकीय तज्ज्ञ, वैद्यकीय परिषद, कायदेतज्ज्ञ आणि शासन यांच्यात व्यापक चर्चा होणे आवश्यक आहे.


IMA च्या मते, आधुनिक वैद्यकशास्त्र हे दीर्घकालीन शिक्षण, प्रशिक्षण, इंटर्नशिप, पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि सातत्यपूर्ण कौशल्यवृद्धीवर आधारित आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे आवश्यक वैज्ञानिक ज्ञान, प्रशिक्षण आणि कायदेशीर जबाबदारी असणे अत्यावश्यक आहे.
रुग्णांच्या हिताशी संबंधित कोणताही निर्णय वैज्ञानिक पुरावे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि विद्यमान कायदेशीर चौकट लक्षात घेऊनच घेतला जावा. अन्यथा रुग्णांच्या सुरक्षिततेसह राज्यातील आरोग्य व्यवस्थेवरील जनतेच्या विश्वासावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यव्यापी आंदोलनादरम्यान अमळनेर शाखेमार्फत अत्यावश्यक व आपत्कालीन वैद्यकीय सेवा अखंड सुरू ठेवण्यात येणार असून गंभीर रुग्णांची कोणतीही गैरसोय होणार नाही, अशी ग्वाही IMA अमळनेर शाखेने दिली आहे.
या निवेदनावर IMA अमळनेरचे अध्यक्ष डॉ. प्रशांत शिंदे, सचिव डॉ. नरेंद्र महाजन, खजिनदार डॉ. मयुरी जोशी यांच्यासह शाखेतील अनेक डॉक्टर व पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, मोठ्या संख्येने IMA सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed