मेन पाईपलाईन तुटल्याने अमळनेरचा पाणीपुरवठा विस्कळीत; पाण्यासाठी नागरिकांची भटकंती, महिलांची नदीवर गर्दी.

0

अमळनेर/आबिद शेख 

अमळनेर : शहराच्या पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन तुटल्यामुळे अमळनेर शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक भागांत नळांना पाणी न आल्याने नागरिकांनी तुटलेल्या पाईपलाईनमधून गळणारे पाणी हंडे, कॅन, बादल्या आणि इतर भांड्यांमध्ये भरण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.


पाणीटंचाईमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असून पिण्याच्या पाण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकंती करण्याची वेळ आली आहे. तुटलेल्या पाईपलाईनखाली हंडे, कॅन आणि बादल्या लावून पाणी साठवण्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. अत्यावश्यक गरजा भागवण्यासाठी नागरिकांना अशा प्रकारे पाणी मिळवावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.


दरम्यान, घरगुती वापरासाठी पाणी उपलब्ध नसल्याने महिलांनी कपडे, भांडी तसेच इतर घरातील वस्तू थेट नदीकाठी आणून धुण्यास सुरुवात केली आहे. नदी परिसरात महिलांची मोठी गर्दी होत असून सकाळपासूनच कपडे, धुणीभांडी करण्यासाठी गर्दी झाल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे.
नागरिकांनी प्रशासनाने तातडीने पाईपलाईन दुरुस्त करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, तसेच तोपर्यंत टँकरद्वारे पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे. पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed