पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रावर सीईओ करिश्मा नायर यांची अचानक धडक; अस्वच्छता, गळती आणि कारभारावर ताशेरे.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : अमळनेर तालुक्यातील पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) करिश्मा नायर यांनी अचानक भेट देत आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीची पाहणी केली आणि कार्यालयीन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. या भेटीदरम्यान आरोग्य केंद्रातील अस्वच्छता, अपूर्ण सुविधा तसेच आयुष्मान भारत योजनेच्या संथ अंमलबजावणीबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

आरोग्य केंद्राच्या नव्याने उभारलेल्या इमारतीला पहिल्याच पावसात गळती लागल्याचे, तसेच आंतररुग्ण विभाग, शस्त्रक्रिया कक्ष आणि इतर खोल्यांमध्ये मोठे तडे गेल्याचे निदर्शनास आले. सीईओंनी संपूर्ण इमारतीची पाहणी करून बांधकामाच्या गुणवत्तेची माहिती घेतली.

भेटीदरम्यान आरोग्य केंद्रातील अस्वच्छतेवर त्यांनी ताशेरे ओढले. स्वच्छतेसाठी आवश्यक साहित्य वेळेवर उपलब्ध होत नसल्याची तक्रारही त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. ग्रामस्थांनी काही कर्मचारी नियमित हजर राहत नसून खाजगी व्यक्तींमार्फत कामे करून घेत असल्याचा आरोप केला. औषधनिर्माण अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबतही तक्रारी करण्यात आल्या. यामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
सध्या आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या दोन्ही महिला वैद्यकीय अधिकारी नवीन असल्याने काही कर्मचारी त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याची माहितीही समोर आली. तसेच तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना सर्व बाबींची माहिती असूनही परिस्थितीवर प्रभावी नियंत्रण नसल्याची टीका ग्रामस्थांनी केली.
आरोग्य केंद्रात पिण्याच्या पाण्याचीही पुरेशी व्यवस्था नसल्याने रुग्ण आणि निवासी कर्मचारी अडचणीत असल्याचे सांगण्यात आले. कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असून अनेकदा शाब्दिक वाद होत असल्याचाही आरोप करण्यात आला. या सर्व बाबींवर तातडीने लक्ष देऊन आवश्यक सुधारणा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
शस्त्रक्रिया विभागाची चावी न मिळाल्याने सीईओंची नाराजी
पाहणीदरम्यान सीईओ करिश्मा नायर शस्त्रक्रिया विभागाची पाहणी करण्यासाठी गेल्या असता संबंधित कक्ष बंद असल्याचे आढळले. खोली उघडण्याचे निर्देश दिल्यानंतर कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. शस्त्रक्रिया कक्षाची चावी औषधनिर्माण अधिकाऱ्यांकडे असल्याने ते त्या वेळी उपस्थित नव्हते. सुमारे दहा मिनिटे प्रतीक्षा करूनही चावी उपलब्ध न झाल्याने सीईओंनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
