सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा संजय पाटील यांच्याकडून निषेध; काँग्रेसने २४ तासांत माफी मागावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा.
अमळनेर | आबिद शेख

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसकडून करण्यात आल्याचा दावा करण्यात आलेल्या “गुंगी गुडिया” या कथित वक्तव्याचा अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाचे माजी मुख्य प्रशासक (चेअरमन) तथा माजी अध्यक्ष श्री. संजय पुनाजी पाटील यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करून काँग्रेस पक्षाने २४ तासांच्या आत जाहीर माफी मागावी, अन्यथा राज्यभर निषेध आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

प्रसिद्धीपत्रकात संजय पाटील यांनी म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या जनतेच्या मताने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी असून त्या राज्यातील महिला सन्मान आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. अशा महिला नेतृत्वाबाबत अवमानकारक भाषा वापरणे हे केवळ एका व्यक्तीचा नव्हे, तर महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांचा अपमान असल्याचे त्यांनी नमूद केले.

राजकीय मतभेद असू शकतात; मात्र महिलांविषयी अपमानास्पद शब्दप्रयोग करणे ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी बाब असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसकडून महिला नेतृत्वावर वैयक्तिक आणि खालच्या पातळीवर टीका केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
काँग्रेस पक्षाने तातडीने या कथित वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी. अन्यथा महाराष्ट्रातील प्रत्येक गावात काँग्रेसविरोधात निषेध आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संजय पाटील यांनी दिला आहे.
शेवटी त्यांनी, “महिलांचा अपमान करणाऱ्याला महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही. आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” असे म्हणत काँग्रेसच्या कथित महिला विरोधी मानसिकतेचा निषेध व्यक्त केला.
