एसआयआर प्रक्रियेला १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; मतदार याद्या पुनरीक्षणाला अधिक वेळ.
24 प्राईम न्यूज 5 Jul 2026

राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाला भारत निवडणूक आयोगाने १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्यातील एसआयआर प्रक्रियेला अपेक्षित गती मिळावी आणि उर्वरित काम वेळेत पूर्ण व्हावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

४ ऑगस्टपर्यंत राज्यात सरासरी ७५ टक्के एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, मुंबई आणि ठाणे परिसरात डिजिटायझेशनचे प्रमाण सुमारे ५० टक्के असल्याने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगाकडे मुदतवाढीची विनंती केली होती.

सुधारित वेळापत्रकानुसार, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडून घराघरात जाऊन पडताळणी करण्याचा कालावधी आता १७ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आला आहे. तसेच, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण आणि पुनर्रचनेचे कामही याच मुदतीत पूर्ण करण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाने नागरिकांना मतदार यादीतील माहितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास दुरुस्ती किंवा नोंदणीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
