ताडेपुरा प्रभाग १२ मधील महिलांचे आंदोलन; पंचनामा, मदत व नाला अतिक्रमण हटविण्याची मागणी.

0

अमळनेर | आबिद शेख 


अमळनेर शहरातील ताडेपुरा प्रभाग क्रमांक १२ मधील पारोळा रोड परिसरात ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीदरम्यान अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र, या भागातील नुकसानग्रस्त घरांचा अद्याप पंचनामा करण्यात आलेला नसल्याचा आरोप करत परिसरातील महिलांनी सोमवारी आंदोलन केले.


ताडेपुरा परिसरात प्रामुख्याने शेतमजूर व कष्टकरी कुटुंबे वास्तव्यास असून, अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरून घरगुती साहित्य, धान्य व इतर वस्तूंचे नुकसान झाले. तरीही संबंधित विभागाकडून पंचनामा न झाल्याने शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागत असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
यावेळी महिलांनी नगरपरिषदेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, या भागात अद्याप पक्का रस्ता, गटार तसेच लाईट पोल यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
आंदोलनादरम्यान महिलांनी परिसरातील मोठ्या नाल्यावर झालेली अतिक्रमणे तातडीने हटविण्याची मागणी केली. नाल्यावरील अतिक्रमणामुळे पावसाचे पाणी अडून थेट घरांमध्ये शिरते. ही अतिक्रमणे काढून नाला मोकळा केल्यास पावसाचे पाणी थेट ताडे तलावात जाईल व भविष्यात घरांमध्ये पाणी शिरण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळताच संबंधित नगरसेवकांनी आंदोलनस्थळी भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली. नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून शासनाची मदत मिळवून देण्यासाठी तसेच परिसरातील मूलभूत सुविधा व नाल्यावरील अतिक्रमणाबाबत संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed