घाबरू नका… शासन तुमच्या पाठीशी!; पूरग्रस्त अमळनेरकरांना मंत्री गिरीष महाजनांचा दिलासा तातडीच्या मदतीसाठी प्रत्येकी ₹१० हजारांची घोषणा; पालकमंत्री, आमदारांसह पूरग्रस्त भागाची पाहणी.

0

अमळनेर | आबिद शेख 


बोरी नदीला ३१ जुलै रोजी आलेल्या महापुरामुळे अमळनेर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी सोमवारी अमळनेर दौरा केला. जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह त्यांनी पूरग्रस्त भागांना भेट देत नागरिकांशी संवाद साधला आणि शासनाकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.


मंत्र्यांनी हेडावे नाका, पारोळा रोड, पैलाड परिसर, मरीमाता चौक व मातंगवाडा या भागांना भेट देऊन पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. घरांमध्ये शिरलेल्या पाण्यामुळे संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह लाखो रुपयांचे नुकसान झालेल्या नागरिकांनी तातडीच्या मदतीची मागणी केली. त्यावर मंत्री गिरीष महाजन यांनी, “घाबरू नका… शासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. कोणताही पात्र नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही,” असा दिलासा दिला.
जलवाहिनीसाठी डीपीडीसीतून निधी
महापुरात शहराच्या पाणीपुरवठ्याची मुख्य जलवाहिनी वाहून गेल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी मंत्र्यांना दिली. त्यानंतर संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. नवीन जलवाहिनी उभारण्यासाठी आवश्यक निधी डीपीडीसीच्या माध्यमातून उपलब्ध करून देत शहराचा पाणीपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
फोटोग्राफर व व्यापाऱ्यांच्या नुकसानीकडेही लक्ष
अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने मंत्र्यांना निवेदन देण्यात आले. महापुरात चार फोटोग्राफरांची दुकाने पाण्याखाली गेल्याने कॅमेरे, संगणक, प्रिंटरसह लाखो रुपयांचे साहित्य निकामी झाल्याची माहिती देत विशेष आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली.
त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांचीही भेट घेण्यात आली. संरक्षण भिंत कोसळल्याने व पुरामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. व्यापाऱ्यांनाही शक्य ती मदत देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले.
तातडीच्या मदतीसाठी ₹१० हजार
पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री गिरीष महाजन यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. पूर्वी आपत्तीग्रस्तांना दिली जाणारी तातडीची मदत ₹५ हजारांवरून वाढवून ₹१० हजार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला असून शेती, घरे, जमीन वाहून जाणे, जनावरे दगावणे आदी सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना मदत दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पिंपळे नाल्यावरील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश
पिंपळे नाल्यावरील अतिक्रमणांमुळे पूरस्थिती गंभीर होत असल्यास तातडीने कारवाई करण्याचे निर्देश मंत्री महाजन यांनी प्रशासनाला दिले. भविष्यात अशा आपत्ती टाळण्यासाठी नाल्यांवरील अतिक्रमणे हटवून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
जयनिल फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक
महापुराच्या काळात जयनिल फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी जीव धोक्यात घालून अनेक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले तसेच लायन्स क्लब, रोटरी क्लब, जैन सोशल ग्रुप आणि पत्रकार संघाच्या सहकार्याने अन्न व पिण्याचे पाणी पुरविण्याचे कार्य केले. या सामाजिक कार्याची माहिती मिळाल्यानंतर मंत्री गिरीष महाजन यांनी जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम पाटील, कार्यकर्ते आणि सर्व सामाजिक संस्थांचे विशेष कौतुक केले.
आमदार अनिल पाटील यांचा पाठपुरावा
आमदार अनिल पाटील यांनी, “महापुरामुळे अमळनेरकरांवर मोठे संकट आले आहे. शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्याबरोबरच पूरग्रस्तांना शासनाच्या सर्व योजना आणि आर्थिक मदत वेळेत मिळावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे,” असे सांगितले.
या दौऱ्यात जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मुख्याधिकारी गणेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, माजी आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. अधिकाऱ्यांना पंचनामे पारदर्शक पद्धतीने तातडीने पूर्ण करून मदत जलदगतीने वितरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed