अतिवृष्टीने अमळनेर तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान; तातडीने पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची मागणी.
अमळनेर | आबिद शेख

अमळनेर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचले असून उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कापूस, मका, सोयाबीन, भाजीपाला तसेच इतर खरीप पिकांवर अतिवृष्टीचा गंभीर परिणाम झाल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

अनेक ठिकाणी शेतांमध्ये अजूनही पाणी साचून असल्याने पिके सडण्याची भीती निर्माण झाली आहे. यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांच्या आशांवर पावसाने पाणी फेरल्याने शेतकरी हवालदिल झाला असून मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, अतिवृष्टी होऊन दोन दिवस उलटूनही महसूल विभाग किंवा कृषी विभागाचे अधिकारी नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करण्यासाठी अनेक गावांमध्ये पोहोचले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त होत असून पंचनाम्याच्या प्रक्रियेला तातडीने सुरुवात करण्याची मागणी जोर धरत आहे.
शेतकऱ्यांनी शासनाकडे कोणत्याही अटी-शर्तींची वाट न पाहता नुकसानग्रस्त शेतीचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी केली आहे. तसेच प्रत्यक्ष नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून नुकसानभरपाईची घोषणा करावी आणि आर्थिक मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, कृषी व महसूल विभागाच्या संयुक्त पथकांनी तातडीने गावागावांत जाऊन पाहणी करून पंचनामे पूर्ण करावेत, जेणेकरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळेत शासनाची मदत मिळू शकेल, अशी अपेक्षा अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
