पूराच्या विळख्यात अडकलेल्या एका महिन्याच्या चिमुकल्याला नगरपालिकेच्या रेस्क्यू टीमने दिले जीवदान.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत अमळनेर नगरपालिकेच्या रेस्क्यू टीमने धाडस, तत्परता आणि माणुसकीचा उत्कृष्ट परिचय देत एक महिन्याच्या चिमुकल्या बाळाची सुखरूप सुटका केली. गुरुकृपा कॉलनी परिसरात पाणी वेगाने शिरल्याने अनेक नागरिक अडकले होते. या दरम्यान अवघ्या एका महिन्याचे बाळही कुटुंबासह पूराच्या विळख्यात अडकले होते.
घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेची रेस्क्यू टीम घटनेची माहिती मिळताच मुख्याधिकारी गणेश शिंदेसह आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, गोल्डी बिऱ्हाडे तसेच अग्निशमन दलाचे फारुख शेख, दिनेश बिऱ्हाडे, भिका सदानंदशीव आणि पवन बिऱ्हाडे यांचे पथक घटनास्थळी धावून पोहोचले. तातडीने घटनास्थळी दाखल झाली. प्रतिकूल परिस्थिती, पाण्याचा वेग आणि अडचणींचा सामना करत टीमने अत्यंत काळजीपूर्वक बाळाला बाहेर काढून सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले. या थरारक बचाव मोहिमेमुळे उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

या बचाव कार्यात रेस्क्यू टीमने केवळ कर्तव्य बजावले नाही, तर मानवतेचेही दर्शन घडवले. संकटाच्या काळात जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या अमळनेर नगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवकांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी नगरपालिकेची रेस्क्यू टीम सातत्याने कार्यरत असून, आवश्यक त्या ठिकाणी मदत व बचाव कार्य सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
