मालेगाव महापालिकेत खळबळ ; बिले मंजूर करण्यासाठी 60 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी आयुक्त रविंद्र जाधव यांच्यासह तिघांना ACB कडून अटक.

0

 

नाशिक / मालेगाव (प्रतिनिधी) :मालेगाव महापालिकेतील दोन कामांची बिले बँक खात्यावर जमा करण्याच्या मोबदल्यात 60 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महापालिका आयुक्तांसह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी अटक केली. विशेष म्हणजे, आयुक्तांना निवृत्तीच्या दोन दिवस आधीच अटक झाली आहे.

अटक करण्यात आलेल्यांची नावे – *आयुक्त रविंद्र जाधव, त्यांचे स्वीय सहायक निलेश पाटील आणि लेखापाल हरिष डिंबर* अशी आहेत. याप्रकरणी मालेगाव किल्ला पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ACB ने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने दोन कंत्राटदारांचे प्राधिकारपत्र घेतले होते. या कंत्राटदारांनी मालेगाव महापालिकेमार्फत केलेल्या कामांची दोन बिले त्यांच्या बँक खात्यावर RTGS द्वारे जमा करण्यासाठी आयुक्त व संबंधितांनी प्रत्येकी 4 टक्के दराने लाचेची मागणी केली होती. या दोन्ही बिलांच्या मोबदल्यात एकूण 60 हजार रुपयांची मागणी करण्यात आली.

20 आणि 21 जुलै 2025 रोजी आयुक्तांचे स्वीय सहायक निलेश पाटील यांनी तक्रारदाराकडे दोन कामांची बिले मंजूर करण्यासाठी चार टक्के दराने लाचेची मागणी केली. याबाबत आयुक्त रविंद्र जाधव यांना विचारून सांगतो, असे म्हणत त्यांनी मागणीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे.

त्यानंतर 23 जुलै 2025 रोजी आयुक्त रविंद्र जाधव यांनीही दोन्ही कामांची बिले मंजूर करण्यासाठी 4 टक्के दराने लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संबंधित कंत्राटदारांच्या बँक खात्यावर बिलांची रक्कम जमा झाल्यानंतर लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती, त्यानंतर ACB ने सापळा रचून तिघांना अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed