अमळनेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई : गावठी कट्टा, जिवंत काडतुसे व कारसह चौघे जेरबंद; स्वतंत्र कारवाईत तलवारही जप्त.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : अमळनेर पोलिसांनी अवैध शस्त्रांविरोधात मोठी कारवाई करत चोपडा मार्गे गांधलीकडून अहिल्यानगरच्या दिशेने गावठी कट्टा घेऊन जाणाऱ्या चौघांना अटक केली. या कारवाईत गावठी पिस्टल, तीन जिवंत काडतुसे आणि चारचाकी वाहन असा एकूण ७ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच रात्री शहरातील भालेराव नगर परिसरात स्वतंत्र कारवाई करत एका तरुणाकडून तलवार जप्त करून त्यालाही अटक करण्यात आली.


पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना चोपडा तालुक्यातून गावठी कट्टा घेऊन एक चारचाकी वाहन गांधली मार्गे अमळनेरकडे येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार एपीआय गणेश अहिरे, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, शरद काकळीज तसेच हेडकॉन्स्टेबल विनोद भोई, विनोद सोनवणे, मंगल भोई, उज्वल पाटील, मयूर पाटील आणि रवींद्र पाटील यांच्या पथकाने गांधली रस्त्यावरील महादेव मंदिराजवळ सापळा रचला.
दरम्यान, एमएच-१७-बीयू-८८९४ क्रमांकाची चारचाकी वाहन तेथून येताच पोलिसांनी ती अडवून तपासणी केली. वाहनात सुरेश उत्तम भालेराव (४४, रा. विठ्ठलवाडी, शिर्डी, जि. अहिल्यानगर), संदीप शांताराम गायकवाड (३१, रा. गवडगाव, ता. येवला, जि. नाशिक), अनिल रघुनाथ कचरे (२८, रा. लक्ष्मीवाडी, सावळीविहीर, जि. अहिल्यानगर) आणि बाबासाहेब नामदेव गायकवाड (२०, रा. पांझरवाडी, ता. येवला, जि. नाशिक) हे चौघे आढळून आले.
झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून सुमारे ३० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल आणि ६ हजार रुपये किमतीची तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच चारचाकीसह एकूण ७ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.
दरम्यान, त्याच रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना भालेराव नगर परिसरातील देवा मनोज पथरोड (वय २०) याच्या घरात तलवार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, शरद काकळीज, सुनील तेली, मिलिंद सोनार आणि विनोद संदानशीव यांच्या पथकाने त्याच्या घरावर छापा टाकला.
घराची तपासणी केली असता पलंगाखाली लपवून ठेवलेली तलवार आढळून आली. पोलिसांनी तलवार जप्त करून संबंधिताविरुद्ध शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed