अमळनेर शहर पावसाने बेहाल; रस्ते जलमय, दुकानदारांचे लाखोंचे नुकसान, नागरिकांकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : शहरात शुक्रवारी दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. मुसळधार पावसाचा फटका शहरातील अनेक भागांना बसला असून मुंदडा नगर, भालेराव नगर, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, इस्लामपुरा, कसाली मोहला, पैलाड तसेच शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.


अनेक ठिकाणी रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले असून वाहनचालकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यांवरील खड्डे पाण्याखाली गेल्याने अपघाताचा धोका वाढला असून दुचाकीस्वारांना विशेषतः त्रास सहन करावा लागत आहे. पादचाऱ्यांनाही चिखल आणि साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी गटारी तुंबल्याने पाणी थेट रस्त्यांवर आले. काही भागांमध्ये घरांसमोर आणि दुकानांसमोर पाणी साचल्याने नागरिकांचे दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले आहेत. बाजारपेठेतील काही व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने लाखो रुपयांच्या मालाचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, शहरातील स्वच्छता व्यवस्था आणि पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या नाल्यांच्या साफसफाईबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. साचलेले पाणी, चिखल आणि कचरा तातडीने हटविण्यात यावा, अशी मागणी नगर परिषद प्रशासनाकडे करण्यात येत आहे.
पावसानंतर डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथीचे आजार पसरण्याची शक्यता लक्षात घेता शहरातील विविध भागांमध्ये तातडीने औषध फवारणी, निर्जंतुकीकरण आणि विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचीही मागणी नागरिकांकडून होत आहे.
एकूणच, मुसळधार पावसामुळे अमळनेर शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. नगर परिषद प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून रस्त्यांवरील पाणी, चिखल आणि कचरा हटवावा तसेच पूरस्थितीग्रस्त भागांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा अमळनेरकर व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed