जळगाव जिल्ह्यात सहा महिन्यांत ४४३ आत्महत्या; लग्न न जमाल्याने २९ युवकांनी उचलले टोकाचे पाऊल.
24 प्राईम न्यूज 31 Jul 2026

जळगाव जिल्ह्यात यंदाच्या १ जानेवारी ते ३० जून २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण ४४३ आत्महत्यांची नोंद झाली असून, त्यापैकी लग्न न जमाल्याने २९ युवकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आत्महत्यांच्या कारणांचे सांख्यिकी विश्लेषण सादर करताना दिली.

उपलब्ध आकडेवारीनुसार, आत्महत्या करणाऱ्यांमध्ये ३८३ प्रौढ, ८ अल्पवयीन मुले, २९ महिला आणि ११ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
आत्महत्यांच्या प्रमुख कारणांमध्ये दारूचे व्यसन (९०), नैराश्य (८७), कौटुंबिक कारणे (७८), कर्जबाजारीपणा (५२), लग्न न जमणे (२९), प्रेमसंबंध (१२), परीक्षेचा ताण (११) आणि मानसिक आजार (८) यांचा समावेश असल्याचे विश्लेषणातून स्पष्ट झाले आहे.
विशेषतः लग्न न जमाल्याने २९ युवकांनी टोकाचे पाऊल उचलल्याची बाब ही गंभीर सामाजिक चिंतेचा विषय असल्याचे श्रीकांत धिवरे यांनी नमूद केले. बदलती सामाजिक परिस्थिती, ग्रामीण भागातील युवकांना विवाहासाठी येणाऱ्या अडचणी आणि वाढता मानसिक ताण या मुद्द्यांकडे समाजाने अधिक संवेदनशीलतेने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात दरमहा सरासरी ७४ तर दररोज दोन ते तीन आत्महत्यांची नोंद होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महिलांमध्ये कौटुंबिक तणाव व नैराश्य, तर अल्पवयीन मुला-मुलींमध्ये कौटुंबिक वातावरण, मानसिक ताण आणि परीक्षेचा ताण ही प्रमुख कारणे असल्याचे निरीक्षण त्यांनी मांडले.
यावेळी श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, मानसिक तणावाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. कुटुंबातील सदस्यांनी नियमित संवाद साधावा, आर्थिक क्षमता लक्षात घेऊनच कर्ज घ्यावे आणि अडचणीत असलेल्या व्यक्तींना वेळेत भावनिक आधार द्यावा. मानसिक आरोग्याबाबत वेळेवर समुपदेशन व तज्ज्ञांची मदत घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
टीप : आत्महत्यांबाबतची आकडेवारी हा सामाजिक प्रश्न अधोरेखित करण्यासाठी आहे. मानसिक आरोग्याच्या समस्या ओळखून वेळेवर मदत घेणे आणि एकमेकांना भावनिक आधार देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.
