अमळनेर पोलिसांचे धडक कोबिंग ऑपरेशन; पिस्तूल, तलवार, इर्टिगा कारसह ₹८.५३ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त.
अमळनेर | आबिद शेख

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या आदेशानुसार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या उपस्थितीत अमळनेर पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणावर विशेष कोबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या कारवाईत शस्त्रसाठा, अवैध दारू, जुगार, वाहतूक नियमभंग तसेच विविध प्रतिबंधात्मक कारवायांद्वारे गुन्हेगारीवर प्रभावी आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या विशेष मोहिमेत अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, ६ दुय्यम अधिकारी, ६२ पोलीस अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे १ अधिकारी व १० अंमलदार सहभागी झाले होते.
शस्त्र अधिनियमांतर्गत दोन गुन्हे.
कोबिंग ऑपरेशनदरम्यान शस्त्र अधिनियमांतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आले. पहिल्या कारवाईत चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आणि सुमारे ₹७ लाख किमतीची मारुती सुझुकी इर्टिगा कार असा एकूण ₹७.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसऱ्या कारवाईत एका आरोपीकडून स्टील मुठीची धारदार तलवार जप्त करण्यात आली. दोन्ही गुन्ह्यांतील एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे ₹७.३८ लाख आहे.
दारूबंदी कायद्यांतर्गत ९ गुन्हे.
अमळनेर तालुक्यातील नालखेडा, नगाव, मठगव्हाण, पिंपळे, नांद्री तसेच शहरातील शनिपेठ परिसरात अवैध दारूविरोधात धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत २५० लिटर उकळते रसायन, १४०० लिटर कच्चे रसायन, १४० लिटर तयार दारू तसेच देशी दारूच्या ४१ बाटल्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईतील जप्त मुद्देमालाची किंमत ₹१ लाख १५ हजार ६४० इतकी आहे.
जुगार अड्ड्यांवर छापे.
शहरातील मच्छी मार्केट, दगडी दरवाजा, बाजारपेठ आणि पैलाड नाका परिसरात जुगाराविरोधात कारवाई करून पाच गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
कोबिंग ऑपरेशनमध्ये दोन किंवा अधिक गुन्हे दाखल असलेल्या ११३ इसमांची चौकशी करण्यात आली. तसेच २५ हिस्ट्रीशीटर पोलीस ठाण्यात बोलावून तपासणी करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या ३२ जणांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.
कोटपा, वाहतूक व इतर कारवाया.
राणी लक्ष्मीबाई चौक परिसरात सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ विक्री व वापर प्रकरणी कोटपा कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर ७ कारवाया करण्यात आल्या.
वाहतूक नियमभंगाविरोधात ३६ प्रकरणे नोंदवून सुमारे ₹५१,२०० दंड वसूल करण्यात आला. यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची ३ प्रकरणे, मोटार वाहन कायद्यांतर्गत इतर कारवाया तसेच बनावटी सायलन्सर वापरणाऱ्या वाहनांवरही कारवाई करण्यात आली.
वारंट बजावणी व प्रतिबंधात्मक कारवाई.
या मोहिमेत १५ पकड वॉरंट, ६ जामिनी वॉरंट बजावण्यात आले. तसेच २१ इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. याशिवाय ११ हॉटेल व लॉजेसची तपासणी करण्यात आली.
पोलीस प्रशासनाने सांगितले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अशा प्रकारचे अचानक कोबिंग ऑपरेशन यापुढेही नियमितपणे राबविण्यात येणार असून गुन्हेगारी व अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.
