अजीम प्रेमजी यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ४२५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा संदेश देत विप्रोचे संस्थापक, उद्योगपती व ज्येष्ठ समाजसेवक अजीम प्रेमजी यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील राजाराम चौधरी यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविला. या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील तब्बल ४२५ विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, वह्या व लेखन साहित्याचे वितरण करण्यात आले.

दि. २४ जुलै रोजी बन्सीलाल पॅलेस सभागृहात झालेल्या कार्यक्रमात नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम मोठा आधार ठरला.
कार्यक्रमाला विजय बग्जिलेवाले, जितेंद्रकुमार शर्मा, किरण निकम, राजाराम चौधरी तसेच उद्योजक विजय माहेश्वरी यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगत सुनील चौधरी यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. सुनील चौधरी हे अजीम प्रेमजी (शेठजी) यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी हा उपक्रम सातत्याने राबवित असून, त्यांच्या या सेवाभावी कार्याचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रवींद्र देशमुख, सुनील माहेश्वरी, एस. डी. भरुचा, महेंद्र कोठारी, सुरेश पाटील, शेखर धनगर, धनराज चौधरी, संजय चौधरी, गौरव चौधरी, शुभम चौधरी तसेच चौधरी परिवारातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूषण चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. डिगंबर महाले यांनी केले, तर आभार प्रदर्शन गौरव चौधरी यांनी केले. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला भक्कम हातभार लावणारा हा उपक्रम समाजातील दातृत्वाची भावना अधिक दृढ करणारा ठरला असून, शिक्षणासाठी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सुनील चौधरी व त्यांच्या मित्रपरिवाराच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
