साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; गुरुंच्या मार्गदर्शनाचे महत्त्व विद्यार्थिनींना पटवून दिले.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : साने गुरुजी कन्या हायस्कूल येथे बुधवारी गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध बासरीवादक योगेश पाटील, संगीत शिक्षक तुषार पुराणिक तसेच शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व गुरुंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. ज्येष्ठ शिक्षक दिलीप पाटील यांनी प्रास्ताविकातून गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद केले. त्यानंतर मुकेश पाटील यांनीही विद्यार्थिनींना गुरुंच्या मार्गदर्शनाचे महत्त्व सांगत प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले.

यावेळी इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थिनींनी गुरूविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी भाषणे सादर केली. इयत्ता ८ अ मधील जानवी पाटील, ८ ब मधील कनक पाटील, ९ अ मधील कल्याणी पाटील, ९ ब मधील लीना पवार, १० अ मधील कल्याणी पाटील तसेच १० ब मधील वैदर्भी पाटील यांनी आपल्या प्रभावी भाषणातून गुरुंच्या ज्ञानदानाची आणि संस्कारांची महती उलगडून सांगितली.
प्रमुख पाहुणे योगेश पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना प्रत्येकाने शिक्षणाबरोबरच एखादी कला आत्मसात करावी, कारण कला व्यक्तिमत्त्व समृद्ध करते आणि जीवनात खरा आनंद देते, असे सांगितले. भविष्यात संस्कारी, कर्तृत्ववान आणि जबाबदार नागरिक बनण्याचा संदेशही त्यांनी दिला.
अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे यांनी महाकवी कालिदास यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगत गुरुंच्या मार्गदर्शनामुळेच व्यक्तीचे जीवन उज्ज्वल होते, असे प्रतिपादन केले. तसेच गुरुपौर्णिमेला ‘व्यास पौर्णिमा’ का म्हणतात, याची ऐतिहासिक व सांस्कृतिक माहिती विद्यार्थिनींना दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी बासरीवादक योगेश पाटील यांनी बासरीवर सुमधुर गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा पाटील व श्रावणी पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन पुनश्री चौधरी यांनी केले.
