शाळांभोवती ५० मीटर परिसरात जंक फूड विक्रीस बंदी; कँटीन व वसतिगृहांसाठी अन्न परवाना बंधनकारक.
24 प्राईम न्यूज 30 Jul 2026

विद्यार्थ्यांमध्ये सकस आहाराच्या सवयी रुजाव्यात आणि जंक फूडचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शाळांच्या आवारात तसेच शाळेच्या कंपाऊंडपासून ५० मीटर परिसरात जास्त चरबी, मीठ व साखर असलेले प्रक्रिया केलेले, पॅकेज्ड खाद्यपदार्थ आणि शीतपेयांच्या विक्री, जाहिराती तसेच मोफत वाटपावर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाची कठोर अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

मुंढे यांनी सांगितले की, शाळांना अन्नपुरवठा करणारे सर्व कँटीन चालक, स्वयंपाकगृहे, मध्यान्ह भोजन योजनेतील भोजन व्यवस्था, वसतिगृहे तसेच इतर अन्नपुरवठादारांकडे अन्नसुरक्षा नियमांनुसार वैध नोंदणी आणि परवाना असणे आता बंधनकारक असेल.
राज्य सरकारने २७ जुलै रोजी शैक्षणिक संस्थांमध्ये अन्नसुरक्षा व पोषणविषयक निकषांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी पालन आदेश जारी केला आहे. या निर्णयाचा राज्यातील सुमारे १.०८ लाख शाळांमधील जवळपास दोन कोटी विद्यार्थ्यांना थेट लाभ होणार असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्यदायी जीवनशैलीसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
